मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी मागील पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रोकड सुलभतेचे उपाय केले होते. मात्र दरम्यानच्या काळात महागाईचा पारा वाढल्याने उद्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणात कपातीची शक्यता धूसर बनली आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मध्यम कालावधीतील महागाईचे ४ टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा महागाईचा दर जास्त आहे. त्यामुळे बाजारातील किमती कमी होण्यासाठी बँकेकडून पुरवठा सुरळीत होणारे उपाय केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या पतधोरणात रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक बुधवार ४ ऑगस्टपासून मुंबईत सुरु आहे. शुक्रवारी गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी १० वाजता पतधोरण जाहीर करतील. करोना संकटाचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या पथावर परत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला ठोस विचार करावा लागेल. त्यामुळे तूर्त उद्याच्या पतधोरणात व्याजदरात शक्यतो कोणताही बदल होणार नाही, असा अंदाज कोटक म्युच्युअल फंडांच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लक्ष्मी अय्यर यांनी व्यक्त केला. २०२०-२१ मध्ये जीडीपी उणे ७.३ टक्के इतका खाली घसरला होता. त्यामुळे विकासाला चालना देण्यासाठी बाजारात आश्वासक वातावरण तयार करणे, रोकड तरलता आणि रोखे खरेदी याबाबत रिझर्व्ह बँकेकडून उद्या उपाययोजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या रोखे योजनांमध्ये यिल्ड वाढण्याच्या दृष्टीने उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या महागाईचा दर ५.१ टक्के आहे. पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढ, खाद्य तेल, खाद्यान्न वस्तू यांच्या किमतीतील वाढ झाल्याने महागाईचा पारा मागील दोन महिन्यात वाढला. सुरळीत पुरवठ्याअभावी तो ५.५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणासाठी बँकेला प्राधान्य द्यावे लागेल, असेही जाणकारांचे मत आहे. मागील पतधोरणात घेतला होता 'हा' निर्णय जून महिन्यात पार पडलेल्या पतधोरण आढावा बैठकीत करोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे सांगत आज रिझर्व्ह बँकेने जीडीपीचा अंदाज घटवला होता. चालू वर्षात विकास दर ९.५ टक्के राहील, असे बँकेनं म्हटलं होते. तसेच रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर ४.२५ टक्के आणि बँक रेट ४.२५ टक्के आहे. त्यामुळे सामान्य कर्जदारांची निराशा झाली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fSRMaX
No comments:
Post a Comment