म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईतील नद्यांना आलेले बकाल रूप बदलून त्यांना मूळ, संपन्न स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास तितकेसे यश येताना दिसत नाही. आता पालिकेने दहिसर आणि ओशिवरा नदीच्या शुद्धीकरणासाठी तब्बल एक हजार ३०० कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आखला आहे. तो कार्यान्वित करण्यासाठी खासगी सहभागातून मलजल केंद्र बांधण्यात येणार आहे. मुंबईतील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी, मैला येत असतो. ही घाण अडवणे कठीण होत असल्याने पालिकेने नवीन पर्याय शोधला आहे. त्यानुसार याप्रकारे येणारे सांडपाणी, मैला अडवून त्यावर प्रक्रिया करण्यासह नद्यांच्या दोन्ही बाजूंना रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पालिका प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला जाणार आहे. पालिकेने या मलजल प्रक्रिया केंद्रासाठी पहिल्यांदा सप्टेंबर २०१९मध्ये निविदा मागिवल्या होत्या. त्यास प्रतिसाद न आल्याने नव्याने निविदा मागवण्यात आल्या. तेव्हाही कोणताही प्रतिसाद न आल्याने पालिकेने अंदाजित खर्चात वाढ करून पुन्हा निविदा मागविल्या होत्या. त्यास शेवटी २०२१ मध्ये कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. पालिकेने या योजनेसाठी ८७८ कोटींचे अंदाजपत्र तयार केले. पण त्यासाठी ज्यादा दराने निविदा आल्याने कर आणि इतर खर्च मिळून ही रक्कम एक हजार ३०० कोटींवर गेली आहे. निवड झालेल्या कंत्रादारास या दोन्ही नद्यांजवळ बांधण्यात येणारे मलजल प्रक्रिया केंद्र १५ वर्षे चालवायचे आहे. ओशिवरा नदी ही गोरेगावमधील आरे वसाहतीतील टेकडीत उगम पाऊन ७.३१ किमी वाहत मालाड खाडीत विसर्जित होते. त्यात एकूण दोन हजार ४०० हेक्टरचे पाणलोट क्षेत्र असून तिला संतोषनगर, रिद्धी-सिद्धी, बिंबिसारनगर, नंदादीप, नेक्सो, मजासनगर आदी नाले येऊन मिळतात, तर दहिसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पाऊन ४.७ किमी प्रवास करून मनोरी खाडीला मिळते. पालिकेने आतापर्यंत नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरणासाठी कित्येक कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, त्या नद्यांमध्ये येणारे सांडपाणी, मैला रोखले न गेल्याने त्यास यश आले आहे. सुमारे १५ वर्षांपासून ही समस्या कायम आहे. दहिसर नदी - मलवाहिन्यांचे बांधकाम : ४.४ किमी - पूरक रस्ते : १.०६ किमी - पर्जन्यवाहिन्यांचे बांधकाम : १.०२ किमी - मलजल प्रक्रिया केंद्र : दोन्ही ठिकाणी एकूण ६.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन - अंदाजित खर्च : २३२ कोटी ७१ लाख ३४ हजार - प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च : २८१ कोटी ओशिवरा (वालभाट) नदी - मलवाहिन्यांचे बांधकाम : ४.७ किमी - पूरक रस्ते : ४.६८ किमी - पर्जन्यवाहिन्यांचे बांधकाम : ५.१० किमी - मलजल प्रक्रिया केंद्र : पाच ठिकाणी मिळून २०.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन - अंदाजित खर्च : ६३७ कोटी - प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च : ६३१ कोटी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kJzOdG
No comments:
Post a Comment