म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईतील सर्वात पहिला समूह पुनर्विकास प्रकल्प असलेल्या भेंडी बाजार समूह पुनर्विकास प्रकल्पातील अडथळ्यांची शर्यत संपली आहे. हा पुनर्विकास प्रकल्प अधिक वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पालिकेला या ठिकाणच्या २४ लहान भूखंडांच्या बदल्यात अन्यत्र पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, भूखंड व्यवहारामधील फरकापोटीच्या २१ कोटी रुपयांची रक्कमही पालिकेला मिळणार आहे. भेंडीबाजार समूह पुनर्विकास प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून कार्यान्वित असून त्यात काही अडथळे जाणवत होते. ती समस्या संपुष्टात आणण्यासाठी पालिकेच्या स्वमालकीच्या २४ भूखंडांच्या बदल्यात मांडवी आणि भुलेश्वर येथे पर्यायी जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासोबतच फरकापोटीचे २१ कोटी रु. मिळणार आहेत. त्यामुळे, पुनर्विकास प्रकल्प जलदगतीने पूर्ण होण्यास साह्य मिळेल, असा दावा केला जात आहे. पालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. परिणामी, पर्यायी जागांवरील इमारतींचा पुनर्विकास त्वरेने होईल, असे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले. भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पास सात वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. तिथे दोन इमारती बांधल्या असून नंतर हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पात पालिकेच्या २४ छोट्या भूखंडांवर पालिकेचे ४२४ भाडेकरू असून त्यांची इतरत्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पुनर्विकासासंदर्भात 'सैफी बुऱ्हानी अप्लिफ्टमेंट ट्रस्ट'ने या भाडेकरूंना भुलेश्वर येथे पर्यायी जागा देण्याचे मान्य केले आहे. पालिकेच्या जागेपासून एक किमी अंतरावर ही पर्यायी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेची पाहणी सुधार समितीने केली आहे पर्यायी व्यवस्था भेंडी बाजार येथील पालिकेच्या जागेतील भाडेकरूंना पालिकेच्या मांडवी विभागातील बाबुल टँक रोड येथे चार हजार ९७ चौ.मी. जागा मिळेल. या इमारतीत सध्या १३७ घरे आणि ८३ अनिवासी बांधकामे आहेत. भुलेश्वर विभागातील मौलाना आझाद मार्ग येथे ४४७.७० चौ.मी जागा मिळणार असून तिथे सध्या १५४ घरे आणि ५० अनिवासी बांधकामे आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iGJDI3
No comments:
Post a Comment