Breaking

Thursday, September 30, 2021

अनोखा विक्रम! शिवदुर्गच्या शिलेदारांनी सर केलं हिमालयातील खडतर 'शोशाला पिक' शिखर https://ift.tt/3mgVehG

: लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र'च्या पथकाने आतापर्यंत सह्याद्रीच्या पर्वत रांगासह राज्यातील अनेक क्लायंबिंग (गिर्यारोहण) मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यानंतर आता 'शिवदुर्ग मित्र' या संस्थेच्या गिर्यारोहण पथकाने नुकतीच हिमालयातील रक्षम गावातील बास्पा व्हॅलीमधील 'शोशाला पिक' ही गिर्यारोहण शिखर मोहीम फत्ते करत एका अनोख्या यशाला गवसणी घातली आहे. 'शिवदुर्ग मित्र'ची हिमालयातील ही पहिलीच मोहीम असल्याने ही मोहीम शिवदुर्गसाठी खूप महत्त्वाची होती. शोशाला पिक क्लायबिंगची ही पहिलीच भारतीय मोहीम होती. त्यामुळे ही मोहीम फत्ते करणारी 'शिवदुर्ग मित्र' ही भारतातील पहिली संस्था ठरली. शिवदुर्गच्या या यशस्वी शिखर मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या गिर्यारोहण पथकाने महाराष्ट्रातील शिखरे वगळता, भारतातील इतर कोणतेही शिखर सर केलेलं नव्हतं. ही त्यांची बाहेरच्या राज्यातील पहिलीच मोहीम होती. तसंच यापूर्वी भारतामधील कोणीही हिमालयातील 'शोशाला पिक' हे कठीण शिखर सर केलेलं नव्हते. असं असतानाही शिवदुर्ग मित्रच्या गिर्यारोहक शिलेदारांनी आकाशातून कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा आणि हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत ही अत्यंत अवघड व खडतर गिर्यारोहण शिखर मोहीम सलग १२ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर फत्ते केली. कसं आहे शोशाला पिक शिखर? शोशाला पिकची उंची ७५० मीटर (क्लायबिंग मार्ग)व समुद्र सपाटीपासून ४७०० मीटर इतकी आहे. ही संपूर्ण मोहीम सचिन गायकवाड सर, ॲड. संजय वांद्रे, सुनील गायकवाड, अशोक मते, राजेंद्र कडू, आनंद गावडे, महेश मसने, गणेश गिद यांच्या मार्गदर्शनाखाली साहसी गिर्यारोहक सचिन गायकवाड, रोहित वर्तक, भूपेश पाटील, योगेश उंबरे, ओंकार पडवळ व समीर जोशी या धाडसी गिर्यारोहक शिलेदारांनी यशस्वी केली आहे. या संपूर्ण मोहिमेच्या चित्रीकरणाची जबाबदारी ही शिवम आहेर यांनी सांभाळली आहे, तर या मोहिमेसाठी 'रेड बुल इंडिया' आणि 'गो प्रो इंडिया' यांचे विशेष योगदान व सहकार्य लाभल्याचं शिवदुर्ग मित्रकडून सांगण्यात आलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AXDDBN

No comments:

Post a Comment