औरंगाबाद : मुख्यमंत्री यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४४ निजामकालीन शाळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची दूरवस्था आणि सातारा-देवळाईमधील भूमिगत मलनि:सारणाची समस्या दूर होणार आहे. तसंच श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत 'वर्षा' येथील बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरू करा...औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत, वसतीगृह तयार आहे. मात्र, अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असं सांगण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसंच ट्रस्टची पुनर्रचना करुन संतपीठात शैक्षणिक वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. संतपीठ विद्यापीठ करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये आणि मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही कामे नगरविकास विभागास महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन स्थानिक वृक्षसंपदेच्या जतनासाठी आणि पक्षी उद्यान म्हणून ओळखलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मनपा आयुक्तांनी गुंठेवारी कक्ष आणि ५२ संस्थांमार्फत विभागनिहाय प्रस्ताव मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यावर गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. तसेच वन विभागाच्या समन्वयाने प्राणी उद्यान व सफारीसाठी जमिनीची कार्यवाही पूर्ण करण्यास सांगितले. औरंगाबाद – अहमदनगर रेल्वे मार्ग औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर मार्गाला पर्याय म्हणून औरंगाबाद–अहमदनगर असा ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग झाल्यास उद्योग आणि व्यापारास चालना मिळेल, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मार्गाचे सर्वेक्षण केले असून व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे नवीन मार्गासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितलं. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय - जिल्हा परिषदेच्या १४४ शाळांची दुरुस्ती - महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून शहरात रस्ते - गुंठेवारीची प्रकरणे वेगाने सोडवणार - घृष्णेश्वर मंदिर सभामंडप बांधकामासाठी निधी - प्राणी उद्यान, सफारीसाठी तातडीने जमीन - औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडणार
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hhOiiM
No comments:
Post a Comment