कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( mamata banerjee ) यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होईल. पश्चिम बंगालमधील भवानीपूर, जंगीपूर आणि शमशेरगंज या विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीत आज मतदान होणार आहेत. ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून टीएमसीच्या उमेदवार आहेत. भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजीव विश्वास हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा दलाच्या १५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. भवानीपूरमधील मतदान केंद्रांच्या २०० मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू केली गेली आहे. भवानीपूरमधील ९७ मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. त्यानंतर मतदान केंद्रांच्या बाहेरची सुरक्षा ही कोलकाता पोलिसांकडे आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. कुठल्याही मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसराच्या आत ५ हून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. शस्त्रे, स्फोटकं, दगडं आणि फटाके आणण्यास बंदी घालण्यात आली आहे, असं कोलकाता पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे. भवानीपूरमध्ये ३८ ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, चार सहआयुक्त, १४ उपायुक्त आणि अनेक सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन अतिरिक्त नियंत्रण कक्ष देखील उघडले आहेत. ईव्हीएमची वाहतूक करण्यासाठी १४१ विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सर्व पोलिसांना रेनकोट घालण्यास आणि छत्री सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. निवडणूक आयोगाने पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर पावसाचे पाणी काढण्यासाठी पंप तयार ठेवण्यास सांगितले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पाटबंधारे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला तयार राहण्यास सांगितल्याचं अधिकारी म्हणाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AP0kI9
No comments:
Post a Comment