: चहाच्या टपरीवर पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव (वय ३१, रा. पेठ वडगाव), त्याचा साथीदार चेतन गावडे (रा. कोरेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रीतम दीपक ताटे (२१, रा. नवीन वसाहत, भादोले रोड, ता. हातकणंगले) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात मटका जुगाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि गुन्ह्याच्या एफआयआरची प्रत देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल अशोक जाधव हा तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करत होता. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आज मंगळवारी वडगाव पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चहाच्या टपरीवर सरकारी पंचांच्या समक्ष पोलीस कॉन्स्टेबल जाधव याने तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच कॉन्स्टेबल जाधव याने त्याचा साथीदार चेतन गावडे याला स्वीकारण्यास सांगितली. त्यानंतर गावडे यानेही स्वत: लाच न स्वीकारता ही ५ हजार रुपयांची लाच प्रीतम ताटे याला स्वीकारण्यास सांगितली. तक्रारदारांकडून ताटे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकऱणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने यांनी कारवाईत भाग घेतला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ogVgcg
No comments:
Post a Comment