म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना नियंत्रण येत असताना मुंबई महापालिकेकडून विविध योजनांना धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी पालिका निवडणुकांचे वेध लागल्याने पालिका , दुरुस्तीचा कामांना वेग आला आहे. पालिका सफाई कामगारांच्या पाच वसाहतींच्या पुनर्विकासासह कामगार वसाहतींसह भाडेकरू वसाहती दुरुस्तीसाठी पालिकेकडून ४८४ कोटी रु. खर्च करणार आहे. त्यातील काही कामांसाठी कमी दराने आलेल्या निविदा दरांची चर्चा सुरू झाली आहे. आज, मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. मुंबई पालिकेकडून गोरेगावमधील प्रगतीनगर आणि मिठानगर येथील सफाई कामगारांच्या दोन वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ३८२ कोटी रु. खर्च केले जातील. या दोन्ही वसाहतींमध्ये २०८ सेवा निवासस्थाने असून तिथे पुनर्विकासानंतर पालिकेस ३०० चौरस फुटांची ८६४ घरे आणि ६०० चौ. फुटांची ८५ घरे मिळणार आहेत. तसेच, गोरेगावमधील जे.पी.नगर, कांदिवलीतील आकुर्ली मार्ग, बोरिवलीतील बाभई नाका येथील सफाई कामगारांच्या वसाहतीसाठी ९८ कोटी रु. खर्च केला जाणार आहे. पालिकेच्या तिन्ही वसाहतींमध्ये ८८ निवासस्थाने असून पुनर्विकासानंतर पालिकेस ३०० चौ. फुटांची ३१७ आणि ६०० चौ. फुटांची ६० घरे मिळतील. या पुनर्विकासामध्ये सफाई कामगारांना ३०० चौ. फुटांची घरे मिळतील. शिव कोळीवाडा येथे पालिकेच्या तीन इमारतींची दुरुस्तीसाठी पालिका ३ कोटी रु., परळ गावमधील कर्मचारी वसाहतीचीही दुरुस्तीसाठी ७६ कोटी रु. खर्च केला जाणार आहे. पालिकेकडून या संपूर्ण पुनर्विकास, दुरुस्तीवर ४८४ कोटी ६६ लाख रु. खर्च केले जाणार आहेत. उणे ३१ टक्के दरांच्या निविदा सायन कोळीवाडा येथील सी सेक्टरमधील तीन इमारतींच्या दुरुस्तीसाठी पालिकेने २ कोटी ८३ लाख रु. इतका कार्यालयीन अंदाजित खर्च मांडला होता. त्यासाठी, कंत्राटदाराने स्थापत्य कामावर ३१.१४ टक्के उणे दराने आणि विद्युत कामावर १५ टक्के उणे दराने सादर केलेल्या निविदेस पालिका प्रशासनाकडून हिरवा कंदील दिला आहे. तसेच, परळ गाव येथील कर्मचारी वसाहत दुरुस्तीसाठी पालिकेने ९० लाख ८५ हजार रु. कार्यालयीन अंदाज मांडला होता. त्यावर निविदेत स्थापत्य कामे आणि विद्युत कामांवर प्रत्येकी उणे २९.८८ टक्के दराने दाखल केलेल्या निविदेस प्रशासनाने पसंती दर्शविली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AbTThg
No comments:
Post a Comment