Breaking

Monday, October 4, 2021

बड्या दलालांना अटक होऊनही मुंबईत कुठून व कसे येतेय ड्रग्ज? https://ift.tt/3a59JQ3

म. टा. प्रतिनिधी, मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मागील वर्षभरात दलाल व त्यांच्या टोळ्यांचे जाळेच उद्ध्वस्त केले आहे. मोठे दलाल, विक्रेते हे तपास यंत्रणेच्या अटकेत आहेत. मात्र, असे असूनही मुंबईत अमली पदार्थ पोहोचत असल्याचे आर्यन खान याच्या घटनेवरून समोर आले आहे. या अमली पदार्थांचे मूळ समुद्रमार्गे होणाऱ्या तस्करीत असल्याचे तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे. अमली पदार्थ दलाली, विक्री व सेवन याविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) कारवाई केली जाते. एनसीबी, मुंबई विभागाने २०१९ मध्ये ३५ कारवायांद्वारे ५५ दलालांना अटक केली होती. २०२० या संपूर्ण वर्षभरात मुंबई आणि परिसरात ४६ कारवाया झाल्या. त्यामध्ये ९० दलाल व अमली पदार्थ पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. एकूणच मागील वर्षभरात ९० हून अधिक कारवायांद्वारे किमान १५० दलाल व विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, अमली पदार्थांची टोळी चालविणारा चिंकू पठाण, त्याचा भाऊ सोनू पठाण आणि आरिफ भुजवाला यांनादेखील एनसीबीने अटक केली आहे. पठाण बंधू हे कुख्यात ड्रग तस्कर असून, आरिफ भुजवाला याच्यासह ते सातत्याने आखाती देशांत जात होते. त्यांचा अंडरवर्ल्डशी जवळचा संबंध होता. या बड्या दलालांच्या अटकेनंतर मुंबईतील स्थानिक पातळीवरील दलालांचे जाळे पूर्णपणे नष्ट झाले होते. दलालांमार्फत दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू व्यक्तींना अमली पदार्थ पुरविणाऱ्या 'मुच्छड पानवाला' या दुकानाच्या मालकाच्यादेखील एनसीबीने मुसक्या आवळल्या होत्या. अशा सर्व बड्या दलालांना अटक झाल्यानंतरही मुंबईत अमली पदार्थांचा साठा सातत्याने येत असल्याने यंत्रणांसमोरील आव्हाने वाढली आहेत. तटरक्षक, सागरी पोलिसांची मदत हवी अमली पदार्थविरोधी तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'एनसीबी मुंबई विभागाचे समीर वानखेडे यांच्या धडक कारवाईनंतर, स्थानिक पातळीवरील अमली पदार्थ विक्री व दलालांचे जाळे संपुष्टात आले आहे. तरीही अशा पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ उपलब्ध करण्यामागे सागरी तस्करीचा हात आहे. पालघर, रायगड जिल्ह्यातील निर्जन समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. ती रोखण्यासाठी तटरक्षक दल, सागरी पोलिस, केंद्रीय नौकानयन महामंडळ अशा सर्व यंत्रणांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.' हरियाणा, पंजाब, दिल्लीचे कनेक्शन मुंबईत एनसीबीची धडक कारवाई सुरू असल्याने अनेक दलाल हरियाणा, पंजाब व दिल्लीत पळून गेले आहेत. त्यांचे ग्राहक मुंबईत आहेत. त्यामुळे नेपाळमार्गे अमली पदार्थांची हरियाणात व दिल्लीत तस्करी होते आणि तेथून हे पदार्थ रस्तामार्गे मुंबईत आणले जातात. अशाप्रकारे मोटरसायकलवरून झालेली मोठी तस्करी तीन महिन्यांपूर्वीच एनसीबीने मुंबईत पकडली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Yn5M6U

No comments:

Post a Comment