दुबई : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्स संघावर अखेरच्या षटकात दमदार विजय साकारला. या विजयासह दिल्लीच्या संघाने एका विक्रमालाही गवसणी घातली आहे. आतापर्यंत एकाही संघाला जे जमले नाही ते दिल्लीच्या संघाने या विजयाह करून दाखवले आहे. दिल्लीच्या संघाचे सुरुवातीपासूनच या सामन्यात योग्य पाऊल पडत गेले. दिल्लीच्या संघाने नाणेफेकही जिंकली आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या संघाला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. चेन्नईचे ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यु प्लेसिस हे दोन्ही सलामीवीर भन्नाट फॉर्मात होते. पण दिल्लीच्या गोलंदाजांनी या दोघांनाही लवकर बाद करण्यात यश मिळवले. दिल्लीच्या संघाने चेन्नईच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला अपवाद ठराल तो चेन्नईचा अंबाती रायुडू. कारण या सामन्यात रायुडूने अर्धशतक झळकावले. रायुडूने या सामन्यात पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. रायुडूच्या या अर्धशतकाच्या जोरावरच चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १३६ धावा करता आल्या. चेन्नईचे १३७ धावांचे आव्हान दिल्लीसाठी माफक वाटत होते. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक मारा करत हा सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने यावेळी तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. पण संघाला शतकासाठी फक्त एक धाव हवी असताना धवन बाद झाला. मोक्याच्या क्षणी धवन बाद झाल्यावर दिल्लीच्या अडचणींमध्ये भर पडली होती. पण यावेळी शेमरॉन हेटमायर हा दिल्लीच्या संघासाठी धावून आला. हेटमायरने यावेळी अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाला विजय मिळवून दिला. हेटमायरने यावेळी १८ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २८ धावा केल्या. दिल्लीच्या संघाने या सामन्यात विजय मिळवला, त्याचबरोबर या आयपीएलमध्ये २० गुण पटाकवणारा दिल्ली हा एकमेव संघ ठरला आहे. या विजयानंतर दिल्लीचा संघ हा २० गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Aa4jOc
No comments:
Post a Comment