Breaking

Monday, October 4, 2021

कोल्हापूरमध्ये लाचखोरीची आणखी एक घटना उघड; वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अटकेत https://ift.tt/3izDzRl

: फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एजंटला अटक करण्यात आली आहे. साईनाथ नामदेव सनगर (वय ३५, रा. देवाळे, नावली, ता. पन्हाळा) आणि त्याचा साथीदार शिरीष बाळू शेटे (वय ३८, रा. शहापूर, ता. पन्हाळा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपींना पकडले. दोघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरपाडळे येथील व्यक्तीचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्याने गावातच एक नवीन गाळा भाड्याने घेतला आहे. व्यवसायाकरिता नवीन वीज कनेक्शन मंजुरीसाठी सात महिन्यापूर्वी देवाळे येथील एमएसईबी शाखेत रीतसर अर्ज केला आहे. नवीन वीज कनेक्शनसाठी कनिष्ठ अभियंता सनगर याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ईमेलवर तक्रार केल्यानंतर तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ अभियंता सनगर याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचं सिद्ध झाले. तसंच लाचेची रक्कम एजंट शेटे यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एजंट शेटे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. दरम्यान, सनगर आणि शेटे यांच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अदिनाश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, विकास माने, नवनाथ कदम, कृष्णात पाटील, सूरज अपराध यांनी कारवाईत भाग घेतला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3a4SvSK

No comments:

Post a Comment