Breaking

Friday, October 29, 2021

एसटी संप चिघळणार? एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस पाठवणार https://ift.tt/3bq4Wti

म. टा. प्रतिनिधी, 'एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा' या मुख्य मागणीने सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण वाढीव महागाई भत्त्यांना मान्यता देत कृती समितीने मागे घेतले. मात्र नाराज कामगार विलीनीकरणावर ठाम राहिल्याने दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही शुक्रवारी राज्यातील ३७ टक्के आगार बंद होती. यामुळे महामंडळाने आक्रमक पवित्रा घेत कामगारांना बडतर्फीच्या नोटिसा पाठवण्याचे आदेश काढले व मेस्मा लावण्याची चाचपणी सुरू केली आहे. संपामुळे ऐन दिवाळीत होणारी अडचण लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी संपाचा प्रभाव अधिक असलेल्या ठिकाणी खासगी वाहतुकीला पूर्णपणे मुभा देण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. मागण्या अपूर्ण असतानाच कृती समितीने माघार घेतल्याने संघटनांच्या हातातील आंदोलन कामगारांच्या हाती गेले आहे. समाज माध्यमातून या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. 'एसटी कामगारांच्या पोटी जन्म घेतला ही आमची चूक आहे का , असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचा तसेच कामाच्या ताणाची, गैरसोयींची दयनीय अवस्था मांडणारा कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. 'आत्महत्या थांबवण्यासाठी विलीनीकरण करा, अन्यथा एसटी कामगारांची मुले आंदोलन करतील', असा इशाराही व्हिडीओतून मुलीने दिला आहे. आंदोलनकर्त्या एसटी कामगारांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्यासाठी महामंडळाकडून विधी खात्याकडे विचारणा करण्यात आली. संपामुळे ३७ आगार बंद असल्याचा महामंडळाचा दावा असला तरी ३७ टक्के आगार बंद असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. 'अहेरी' आगारात आंदोलनर्त्या कामगारांसाठी कामगारांनीच सामूहिक जेवण तयार केले. हे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले. कृती समितीने माघार घेतल्याने कामगारांशी संवाद साधण्यासाठी महामंडळाकडून आलेले आदेशही समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले. बडगा उगारा 'एसटी कर्मचारी कृती समितीने पुकारलेले उपोषण मागे घेतले आहे. आता नियमबाह्य आंदोलन सुरू असून यात सहभागी होणाऱ्या कामगारांवर तातडीने सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात यावी', असे लेखी आदेश महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत. औद्योगिक न्यायालयाने एसटी महामंडळात सुरू असलेले आंदोलन, संप बेकायदा ठरवला असून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. कर्मचाऱ्याची आत्महत्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी आगारात चालक दिलीप हरिभाऊ काकडे (५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. आगारात उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात काकडेही सहभागी झाले होते. मध्यरात्री संप मिटला. मात्र, काकडे यांनी आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तर नागपूर येथे कमलेश ठाकरे हे आत्महत्या करत असतानाच सहकाऱ्यांच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Y3Em6c

No comments:

Post a Comment