: हर्सूल ते जटवाडा रस्त्यालगत वाहत्या खदानीत २९ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना बुधवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या दरम्यान समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बेगमपूरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक विभागाच्या जवानांनी पाण्यावर तरंगणारा मृतदेह बाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह घाटीत पाठवण्यात आला. यासंदर्भात माहिती अशी की, जटवाडा रस्त्यालगत अंबर हिल ते सईदा कॉलनीच्या मधील एका वीटभट्टीजवळ वाहणारी खदाणी आहे. इथे महिला कपडे धुतात. दरम्यान सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराला साधारण २९-३० वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्याने वीटभट्टीच्या मालकीण अमिनाबी यांना माहिती दिली. दरम्यान तिथून जाणाऱ्या सतीश जाधव या ट्रॅक्टरचालक युवकाने सदर प्रकाराची माहिती १०० नंबरवर कॉल करुन दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पदमपुरा अग्निशमन विभागाचे प्रमुख मोहन एल. मुंगसे, एल. पी. कोल्हे, अब्दुल अजीज, शिवसंभा कल्याणकर, संग्राम मोरे, अप्पासाहेब गायकवाड, योगेश दुधे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी बेगमपूरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पथकासह धाव घेत पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे मारहाणीचे व्रण, खुणा दिसून आल्या नाहीत. महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मृतदेहाच्या नाकातोंडातून पाणी मिश्रीत रक्त वाहत होते तर शरीर पूर्णता फुगलेल्या अवस्थेत होते. हा मृतदेह किमान दोन दिवसांपासून पाण्यात असावा अशी शंका निरीक्षक पोतदार यांनी व्यक्त केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vR2KUO
No comments:
Post a Comment