म. टा. विशेष प्रतिनिधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना अद्यापही प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. वसुली आली की या सरकारचा 'ससा' होतो आणि शेतकऱ्यांना मदत करायची वेळ येते तेव्हा सरकारचा 'कासव' होतो, अशी टीका विरोधी पक्षनेते यांनी शुक्रवारी केली. देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील परिसराची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकटात आहे, मात्र राज्य सरकारकडून काहीही मदत जाहीर झालेली नाही. मार्च, एप्रिल, मे २०२१मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पाच महिन्यांनी शासनादेश निघाला. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर मदतीची प्रेसनोट तीन महिन्यांनी काढली. सहा-आठ महिने मदतीचे आदेशच निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी ५० हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक आहेत. जुलै २०२१च्या मदतीची सरकारकडून भरघोस घोषणा करण्यात आली. त्यानुसार नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून फक्त १० कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व पाच जिल्हे मिळून फक्त १ लाख रुपये, म्हणजे एका जिल्ह्यासाठी फक्त २० हजार रुपये. शेतकऱ्यांप्रति 'नक्राश्रू' ढाळणारे 'महाविकास' नेते आता बंद पुकारतील काय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FyS0iG
No comments:
Post a Comment