: मंत्रालयात नोकरी लावतो, असं सांगून दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश जगन्नाथ पवार (रा. चचेगाव, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. हिम्मतराव बाळू निंबाळकर (रा. मोगरायाचीवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असं फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे, तर ओंकार राजेंद्र माळी आणि प्रथमेश अशोक हर्षे अशी फसवणूक झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, फिर्यादी गणेश पवार व संशयित हिंमतराव निंबाळकर यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखी दरम्यान हिम्मतराव निंबाळकर याने आपण मंत्रालयात नोकरीस असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी हिम्मतराव निंबाळकर याने मुंबई मंत्रालयात सहा जागा भरावयाच्या आहेत, असं गणेश पवार यांना सांगितलं. त्यावेळी गणेश पवार यांनी ओळखीतील दोघांना नोकरी लावायचे असल्याचे निंबाळकर याला सांगितले. नंतर निंबाळकर याने त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं सांगून एका उमेदवारासाठी अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार गणेश पवार यांनी निंबाळकर यांच्या सांगण्यावरून ७ जुलै २०२१ रोजी मीना कांतीलाल नगारे यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये पाठवले, तर त्याच दिवशी महेश विष्णू हर्षे याच्या बँक खात्यावरून महेश प्रजापती यांच्या बँक अकाऊंटवर ५० हजार रुपये व प्रथमेश अशोक हर्षे यांच्या बँक अकाऊंटवरून मीना नगारे यांच्या बँक खात्यावरती ५० हजार पाठवले. त्यानंतर ओमकार माळी व प्रथमेश अशोक हर्ष यांना कामास लावण्यासाठी तीन लाख ५० हजार रुपये रोख हिम्मतराव निंबाळकर याच्याकडे दिले. असं दोघांना नोकरी लावण्यासाठी हिम्मतराव निंबाळकर याला पाच लाख रुपये देण्यात आले होते. पैसे घेतल्यानंतर मात्र निंबाळकर हा गणेश पवार व इतरांचा फोन उचलत नव्हता. तसंच त्याचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गणेश पवार यांनी एक दिवस मंत्रालयात जाऊन खात्री केली असता हिम्मतराव निंबाळकर नावाची व्यक्ती मंत्रालयात नोकरीला नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश पवार यांनी हिम्मतराव निंबाळकर याच्याविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते अधिक तपास करत आहेत. दरम्यान अशा स्वरूपाची नोकरीस लावतो म्हणून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास किंबहुना संशयित व्यक्तीने आणखी कोणाला फसवलं असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन सपोनि रेखा दुधभाते यांनी केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BeLkUj
No comments:
Post a Comment