मुंबई : ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनला जामीन मिलाल्यामुळे गौरी आणि शाहरुख खान यांच्या जीवात जीव आला आहे. गेल्या २६ दिवसांपासून आर्यनसाठी या दोघांनी जी 'मन्नत' मागितली होती ती आज पूर्ण झाली. आर्यनची जामीनावर सुटका झाल्याने शाहरुखच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. आर्यनला जामीन मिळाल्यामुळे दिवाळी आणि त्याला घरच्यांसोबत साजरा करता येणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर गौरीला खूप आनंद झाल्याची माहिती खान कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दिली. आर्यनला अटक झाल्यापासून गौरीने गोड खाणे सोडले होते. इतकेच नाही तर जोपर्यंत आर्यन घरी परत येत नाही तोपर्यंत गोड पदार्थ करण्यावरही तिने बंदी घातली होती. त्याआधी ८ ऑक्टोबरला गौरीचा वाढदिवसही साजरा झाला नव्हता. आर्यन जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता तेव्हा गौरी त्याला भेटायला गेली होती. आर्यनला भेटून परतल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. आता आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शाहरुख खानचा दोन नोव्हेंबर रोजी असलेला वाढदिवस संपूर्ण कुटुंब एकत्र साजरा करणार आहे. त्यातच दिवाळी असल्याने हा सण 'मन्नत'वर जोरदार सेलिब्रेशन होणार हे नक्की. वडिलांचा वाढदिवस आणि दिवाळी आर्यन आपल्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. खरे तर आर्यनला जामीन मिळाल्याच्या बातमीनंतरच मन्नतवर दिवाळी साजरी करायला सुरुवात झाली आहे. मुंबईहून गोव्याला जाणा-या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीमधून आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नव्हते परंतु एनसीबीने त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप केला होता. आर्यनला अटक झाल्यानंतर सत्र न्यायालयामध्ये त्याला जामीन मिळू शकला नाही. त्यानंतर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर या प्रकरणाची तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर गुरुवारी आर्यनसह इतर दोघांना जामीन मंजूर करण्यात आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pOrKuT
No comments:
Post a Comment