Breaking

Friday, October 29, 2021

आर्यन खानची आज सुटका; 'या' अटी कायम https://ift.tt/3q5py2D

म. टा. विशेष प्रतिनिधी, बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर होऊनही पुढील कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागली. अखेर आज, शनिवारी सकाळी ११च्या सुमारास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन आर्यन तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्यन व अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने यांनी गुरुवारी जामीन मंजूर केला होता. त्या जामीन आदेशाचा मुख्य भाग शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास उपलब्ध झाल्यानंतर त्याची प्रत घेऊन ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे व त्यांच्या टीमने तातडीने विशेष एनडीपीएस न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने हमीदाराविषयी घातलेल्या अटीप्रमाणे अभिनेत्री जुही चावलादेखील संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एनडीपीएस न्यायालयात पोहोचली. त्यानंतर इतर कायदेशीर प्रक्रिया होऊन आर्यनच्या सुटकेचा आदेश या न्यायालयाकडून आर्थर रोड तुरुंगात पोहोचेपर्यंत सुटकेची वेळ निघून गेल्याने आर्यनला शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. आर्यनची शुक्रवारी सुटका होणार म्हणून त्याच्या चाहत्यांनी आर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती. अखेर रात्री उशिरा गर्दीला पांगवण्यात पोलिसांना यश आले. आर्यनसह तिघांसाठी अटी - एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार - एनडीपीएस न्यायालयात पासपोर्ट जमा करावा लागेल आणि न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जाता येणार नाही - या प्रकरणातील सहआरोपी व अशाप्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये - या प्रकरणातील साक्षीदारांवर स्वतः किंवा कोणाच्याही माध्यमातून दबाव आणू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये - या प्रकरणाशी संबंधित खटल्याबद्दल प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावर काहीही बोलू नये - कधीही मुंबईबाहेर जायचे असल्यास एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवास व निवासाचा तपशील द्यावा लागेल - तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहावे लागेल - जो आरोप आहे व जो गुन्हा दाखल झाला आहे अशाप्रकारच्या कृत्यात सहभागी होऊ नये - खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर ती लांबवण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नये - खटल्यावर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य करू नये - अत्यंत अपरिहार्य कारण वगळता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल - अशा सर्व अटींपैकी कोणतीही अट आरोपींनी मोडल्यास एनसीबीला त्यांचा जामीन रद्द होण्यासाठी थेट विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज करता येईल


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Y1nYTG

No comments:

Post a Comment