उत्तरकाशीः उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या नौदलाच्या ५ गिर्यारोहकांपैकी ४ जणांचे मृतदेह शोध मोहीमेत हाती आले आहेत. तर नौदलाचा ५ वा जवान आणि एका शेरपाचा शोध अजूनही सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्रिशुल पर्वतावर झालेल्या हिमस्खलनात नौदलाचे ५ जवान बेपत्ता झाले होते. यातील ४ जवनांचे मृतदेह आज चमोलीत आढळून आले. यात लेफ्टनंट कमांडर रजनीकांत यादव, लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी, लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती, हरिओम एमसीपीओ-II यांचा यात समावेश आहे. लेफ्टनंट कमांडर रजनीकांत यादव आणि लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती हे दोघे नौदल अधिकारी मुंबईतील आहेत नौदलाचा ५ वा जवान आणि एक शेरपा अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. बचाव पथकाला त्रिशुल पर्वत चमोलीतून ४ गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले आहेत. इतर दोन जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती नेहरू गिर्यारोहण संस्था (NIM) चे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांनी ही माहिती दिली. त्रिशुल पर्वतावर शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनात ५ जवान आणि एक शेरपा बेपत्ता झाले होते. संरक्षणमंत्र्यांकडून शोक व्यक्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्रिशुल पर्वतावरील भारतीय नौदलाच्या गिर्यारोह मोहीमेत सहभागी असलेल्या ४ जवानांचा मृत्यू झाला. यामुळे अत्यंत दु:खी आहे. या दुर्घटनेत देशाने फक्त ४ तरुण गमवले नाही, तर नौदलाच्या धाडसी जवानांनाही मुकलो आहोत, असं राजनाथ सिंह यानी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. खराब हवामानामुळे अडचणी खराब हवामानामुळे बचाव मोहीमेत अडचणी येत आहेत. बचाव पथकाचे सदस्य सतलज शिबिर २ पर्यंत पोहोचले आहेत. उद्यापर्यंत ते ठिकाणापर्यंत पोहोचतील, असं कर्नल बिष्ट यांनी सांगितलं. एनआयएम, उत्तरकाशीतील बचाव पथकाची एक टीम, हाय अल्टीट्यूड वॉर फेअर स्कूल, गुलमर्ग आणि गढवाल स्काउट्सच्या जवानांचे संयुक्तपणे शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्रिशुल पर्वत सर करण्याची मोहीम नौदलाच्या २० सदस्यांची टीम १५ दिवसांपूर्वी ७१२० मीटर उंच असलेले त्रिशुल पर्वत सर करण्यासाठी निघाली होती. ३ सप्टेंबरला ही टीम मुंबईतून रवाना झाली होती. यापैकी १० गिर्यारोहकांची टीम शुक्रवारी पहाटे त्रिशुल पर्वतावर चढाई करण्यासाठी निघाली, त्यावेळी अचानक हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात नौदलाचे ५ जवान आणि एक शेरपा सापडला. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्रिशुल पर्वत हा बागेश्वर जिल्ह्यात आहे. तीन पर्वतांच्या समूहाला त्रिशुल म्हटले जाते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oAjcHo
No comments:
Post a Comment