मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंग, बहिष्कार घालण्याचा जणू काही ट्रेंडच सेट झाला आहे. अनेक कंपन्या, ब्रँड त्यांचे नवीन प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया मांडत आहेत. जाहिराती करत आहेत. परंतु त्यात काही ना काही वाद निर्माण करून त्यांच्यावर टीका,ट्रोल, बहिष्कार घातला जात आहे. असाच अनुभव प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यासाची यांना आला आहे. सब्यासाची यांचा स्वतःचा ज्वेलरीचा ब्रँड आहे. या ब्रँडने मंगळसुत्राचे काही कलेक्शन मार्केटमध्ये आणले आहेत.याची जाहिरात त्यांनी ज्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सब्यसाची यांनी नुकतेच नवीन ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. त्यातील मंगसुत्राच्या नवीन कलेक्शनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 'इंटिमेट फाईन ज्वेलरी' असे त्यांच्या कलेक्शनचे नाव आहे. या कलेक्शनमधील मंगळसूत्र घालून जाहिरातीसाठी जे फोटो काढण्यात आले आहेत त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. जाहिरातीच्या या फोटोमध्ये एक स्थूल मॉडेलने आंतर्वस्त्रे परिधान केले आहे आणि तिने गळ्यात नवीन कलेक्शनमधील एक मंगळसूत्र घातले आहे. तर दुस-या एका जाहिरातीमधील फोटोमध्ये दोन मॉडेल काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असून त्यांनी वेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घातले आहे. जाहिरातीमध्ये दाखवलेले सर्व महिला मॉडेल शर्ट न घातलेल्या पुरुष मॉडेलसोबत दिसत आहेत. तर जाहिरातीमधील काही फोटोंमध्ये समलैंगिक जोडप्यांना दाखवले आहे. अशा पद्धतीने मंगळसूत्राची जाहिरात केल्यामुळे सोशल मीडियावर सब्यासाची यांच्यावर कडाडून टीका होत आहे. मंगळसूत्राची जाहिरात आहे की आंतर्वस्त्रांची मंगळसूत्राच्या फोटोशूटसाठी दुसरा कोणताच मार्ग सापडला नव्हता का, असा सवाल एकाने यावर केला. तर हे मंगळसूत्र आहे की कामसूत्र, अशा शब्दांत एका युझरने खिल्ली उडवली आहे. काहींनी सब्यसाचीवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. दागिन्यांचे प्रमोशन करा, महिलांचे नको, असाही सल्ला काही युझर्सने दिला आहे. आणखी एका युझरने लिहिले आहे की, 'सब्यासाची तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.' आणखी एका युझरने लिहिले की, 'हे फोटो पाहून मला ही आधी अंतर्वस्त्रांची जाहिरात आहे असेच वाटले...नंतर ही जाहिरात वाचली तेव्हा मला कळले की तुम्ही मंगळसूत्राची जाहिरात करत आहात ते...' अर्थात सब्यासाची ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सब्यासाची हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांसाठी त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. कपड्यांसोबतच सब्यासाची ब्रँडचे दागिनेसुद्धा त्यांच्या अनोख्या डिझाइनमुळे चर्चेत असतात. सुंदरतेची वेगळी परिभाषा मांडण्यासाठी सब्यासाचीने त्यांच्या ब्रँडच्या फोटोशूटमध्ये अनेकदा सावळ्या आणि स्थूल मॉडेल्सनाही प्राधान्य दिलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jNm54C
No comments:
Post a Comment