नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( ) मंगळवारी ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना कोळसा पुरवठ्याच्या ताज्या ( ) स्थितीबद्दल माहिती दिली. कोळसा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि पुढील कृती आराखड्याचा आढावा घेतला. देशात कोळशाची कमतरता नाही आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे, असं दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. सूत्रांनी ही माहिती दिली. ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची बैठक होण्यापूर्वी आणखी एक बैठक झाली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दोन्ही मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक घेतली. ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार जैन यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत कोळशाची उपलब्धता आणि विजेच्या सद्यस्थितीवर सादरीकरण (प्रेझेंटेशन) केलं. देशात कोळशाची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे येत्या ७-१० दिवसांत वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा सामान्य होण्यास सुरवात होईल, अशी माहिती दोन्ही सचिवांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना दिली. गेल्या दोन दिवसांत १९.२० लाख टन कोळसा वीजनिर्मिती केंद्रांना पुरवला गेला आहे. तर मागणी १८.७० लाख टन इतकी आहे, असं सचिवांनी बैठकीत सांगितलं. ऊर्जा मंत्रालयाने २१ ऑक्टोबरपासून रोज २० लाख टन कोळशाची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या मागणीनुसार कोळसा पुरवला जाईल आणि पुढील १५ ते २० दिवसांत वीजनिर्मिती प्रकल्पांकडील कोळशाचा साठा वाढू लागेल, असं बैठकीनंतर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BPUirr
No comments:
Post a Comment