दुबई : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर थरारक विजय साकारला आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मॅथ्यू वेडने यावेळी सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेडने यावेळी १७ चेंडंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नााबाद ४१ धावांची खेळी साकारली, मार्कस स्टॉइनिसने नाबाद ४० धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने ४९ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पाकिस्तानच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला तिसऱ्याच चेंडूवर बाद केले, फिंचला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पाकिस्ताननने मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ यांनाही बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा एकहाती सामना लढवत होता, पण वॉर्नरला शादाब खानने बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३० चेंंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली, वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलही सात धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी पराभवाची घंटा वाजली. पाकिस्तानच्या शादाब खानने यावेळी चार विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के दिले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि त्यांनी पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. या सामन्यात टॉस महत्वाचा होता, कारण आतापर्यंत धावांचा पाठलाग करणारा संघ ११ पैकी १० सामन्यांमध्ये जिंकला होता. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करत ही आकडेवारी खोटी ठरवण्याचा विडा उचलला. कारण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी यावेळी १० षटकांमध्ये ७१ धावांची सलामी दिली. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने बाबरला ३९ धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. बाबर आऊट झाल्यानंतरही पाकिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करणे सोडले नाही. मोहम्मद रिझवानने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. रिझवानने यावेळी आपले अर्धशतकही झळकावले. मिचेल स्टार्कने रिझवानला बाद करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. रिझवानने यावेळी तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. रिझवान बाद झाल्यावर फखर झमानने तर धडाकेबाज फटकेबाजीचा सपाटा सुरुच ठेवला. झमानने यावेळी ३२ चेंडूंच तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियापुढे १७९ धावांचे आव्हान ठेवता आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DbwazS
No comments:
Post a Comment