म. टा. विशेष प्रतिनिधी, तापमानामध्ये झालेला बदल, सैल करण्यात आलेले निर्बंध, उकाड्यामुळे संसर्गजन्य आजारासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंना मिळालेले पोषक वातावरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे 'व्हायरल' तापाचा मुक्काम वाढत आहे. यापूर्वी हा ताप तीन ते पाच दिवस राहायचा. आता मात्र त्याचा त्रास आठ ते १० दिवस जात नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले. 'व्हायरल' तापाची लक्षणे ही करोनासंसर्गासारखी असल्यामुळे त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमधून कोणतेही निश्चित निदान झाले नाही तरच करोनाची चाचणी केली जाते. 'व्हायरल' स्वरूपाच्या तापामध्ये अंगदुखी, हातपाय डोके दुखणे, पोट फुगणे, पोटदुखीसह खूप ताप येणे ही लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये पहिल्या दिवशी ताप येतो, त्यानंतर तीन ते चार दिवस सर्दी खोकला सौम्य स्वरूपामध्ये राहतो व पुन्हा ताप येण्यास सुरुवात होते. डेंग्यू, मलेरिया तसेच चिकन गुनियासारख्या साथीच्या आजारांचा त्रासही वाढता असल्याने वैद्यकीय निदान करण्यासाठी तीन दिवसांनी चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. फिजिशिअन डॉ. अशोक मोरे यांनी या प्रकारच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण येत असल्याचे सांगितले. या तापाचा कालावधी वाढलेला दिसतो. काहीजणांना सर्दीमुळे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, सतत नाक गळणे, नाक चोंदणे असा त्रास दिसून येतो. प्रतिजैविकांमुळे पोटदुखी, जुलाब होणे या तक्रारीही दिसून येतात. बाहेरचे खाताना सावधान प्रवासाच्या वा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेर खाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. मात्र हे अन्न खाताना खात्री करून घ्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. बाहेर उघड्यावर तयार होणारे पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात. तसेच अनेक दिवस साठवून ठेवलेल्या मसाल्यामुळेही अन्नातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावरील अन्नाची चाचपणी केली जाते, मात्र सर्वच हॉटेलांमधून अन्न कशाप्रकारे तयार केले जाते, त्यात सर्व निकषांचे पालन होते का, हे पाहिले जात नाही. केवळ सणासुदीलाच नव्हे तर या तपासण्या नियमितपणे होण्याची गरज अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या विपिन म्हात्रे यांनी व्यक्त केली. भरपूर पाणी, पोषक अन्न व आराम अनेक रुग्णांमध्ये सीआरपी म्हणजे संसर्गाची पातळी अधिक दिसते. ताप हाताला लागत नाही, मात्र तो असतो. ताप गेल्यानंतरही ही पातळी काही दिवस खाली येत नाही. त्यामुळे औषधोपचारांसोबत भरपूर पाणी, पोषक आहार आणि विश्रांती घेतल्यामुळे त्रास निश्चितपणे कमी होतो, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30HXsAd
No comments:
Post a Comment