पुणे : दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुणे शहरातही () १५ दिवसांपूर्वी एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून आला होता. करोनाची लक्षणे आढळल्यामुळे सदर व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये होता. या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पुण्यात आलेली ही व्यक्ती करोनाबाधित आढळली असली तरी या व्यक्तीला ओमायक्रॉन या नव्या विषाणूचीच लागण झाली आहे का, याची खात्री करवून घेण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुढे लॅबटेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्याप्रमाणे ओमायक्रोनचे म्युटेशन डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जलद गतीने होते. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठं संकट ओढावलं जाऊ शकतं. दरम्यान, पुण्यासह राज्यात इतर ठिकाणीही आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांपैकी आणखी पाच जण करोनाच्या विळख्यात सापडलेले असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र त्यांना ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचीच बाधा झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pbLXZL
No comments:
Post a Comment