नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी कमी होऊ शकतात. जगभरातील परिस्थिती पाहता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर ऊर्जा तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जाहीर केले जातात. यावेळी १ डिसेंबरला जाहीर करण्यात येणाऱ्या नवीन दरात सिलिंडरचे दर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती घसरल्या आहेत, हे यामागचे महत्वाचे कारण आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (चलन आणि ऊर्जा संशोधन) अनुज गुप्ता यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याच्या बातम्यांमुळे संपूर्ण जग हादरले आहे. त्यामुळेच जगभरातील देशांनी पुन्हा एकदा विमान प्रवासावर बंदीसह लॉकडाऊनचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत एका दिवसात सुमारे १२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७२ डॉलरवर आली आहे. येत्या काळात ओमिक्रॉनचा धोका वाढला, तर जगभरातील देश निर्बंध लागू करतील. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होईल. तसेच जागतिक दबावानंतर २ डिसेंबरला होणाऱ्या ओपेक देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. कच्च्या तेलाचा पुरवठा वाढल्याने आणि मागणी कमी झाल्यामुळे किंमती खाली येणे साहजिक आहे. कच्च्या तेलाचा दर ७२ डॉलरच्या आसपास राहिला, तरी भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाच रुपयांनी कमी होतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o6mvFP
No comments:
Post a Comment