औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटना वाढल्याचा पाहायला मिळत आहे. अशीच काही घटना जाधववाडी परिसरातील मारोती नगर भागात घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून १९ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील सुरेश घुसे या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तो राहत असलेल्या परिसरातील पाणीपुरीच्या गाडावर पाणीपुरी खाण्यासाठी गेला असता, तिथे उपस्थित असलेल्या सार्थक गणोर आणि सनी ठाकूर यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण निखिलने नकार दिल्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर निखिल तेथून निघून गेला आणि आपल्या एका मित्रासोबत निघाला असतांना, सार्थक आणि सनी यांच्यासोबत आणखी अतुल ठाकूर नावाचा तरुण या तिघांनी पुन्हा अडवून निखिलला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण पैसे नसल्याचं म्हणताच, सनी ठाकूर याने निखिलच्या उजव्या दंडावर चाकू मारून त्याला जखमी केलं. निखिल याने घटनास्थळावरुन कशीबशी सुटका करत हर्सूल पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पण निखिलच्या हाताला जखम झाली असल्याने पोलिसांनी त्याला मेडिकल मेमो देत उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर निखिल याच्या तक्रारीवरुन वरील तिघांवर हर्सूल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yZCSIf
No comments:
Post a Comment