Breaking

Tuesday, December 28, 2021

नववर्षाच्या स्वागताला लोणावळ्यात जाण्याचा प्लॅन असेल तर पोलिसांनी दिलेली 'ही' माहिती वाचाच! https://ift.tt/3Eu0aac

: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळा-खंडाळ्यासह मावळातील पर्यटन स्थळे सजली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील बहुतांश हॉटेल्सची समाधानकारक बुकिंग झाली असून, सेकंडहोम असलेले बंगले व मावळातील जलाशयांच्या किनाऱ्यांवर असलेल्या कृषीपर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे. मात्र लोणावळा व मावळात नववर्षाच्या स्वागताला आल्यानंतर करोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदीसह इतर नियमांचे पालन करा, असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा पोलिसांनी दिला आहे. () सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. यामुळे लोणावळा शहर व मावळतील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून, यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे. लोणावळ्यातील कुमारचौक, रायवूड कॉर्नर, भांगरवाडी याठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. ब्रीद अॅनालाइझर मशिनद्वारे मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक व बंगलेधारकांनी येणार्‍या पर्यटकांची ओळखपत्रे व नोंदी करुन घ्याव्यात तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावून घ्यावेत, अशा सूचना पोलीस प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना दिल्या आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजेपर्यंतच मर्यादित आवाजाच्या क्षमतेनुसार वाद्यांना परवानगी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. रात्री सातनंतर भुशी डॅम, टायगर, लायन्स व राजमाची पॉईंटस, तसंच गडकिल्ले अशा पर्यटनस्थळांवर बंदी असल्याने कोणीही धोकादायकपणे त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न करु नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही असे वर्तन करु नये. शहरातील वातावरणाचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत हे उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात करावे, नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करून धांगडधिंगा, हुल्लडबाजी केल्यास व मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास संबंधितांच्या नववर्षाची सुरुवात ही पोलिस कोठडीतच होईल, असा इशाराच लोणावळा पोलिसांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pyTt2j

No comments:

Post a Comment