धुळे : लुटीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना गुजरातमधून पोलीस वाहनाने घेऊन येणार्या नांदेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना सोनगीर पोलिसांनी शिताफीने पकडलं आहे. लामकानी ग्रामस्थांच्या मदतीने हे दोन्ही आरोपी पकडण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितलं आहे. () पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं, की नांदेड जिल्ह्यातील तरोडा बुद्रुक येथील विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील नवप्रीतसिंग तारेशसिंग ऊर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट (रा. जस्तरवाल, ता. अजनाला, जि. अमृतसर, पंजाब) व मोहित ऊर्फ मनी विजय शर्मा (रा. गल्ली क्रमांक 3, बाटला रोड, प्रीतनगर, ता. अमृतसर, पंजाब) या दोन आरोपींना गुजरातमधील व्यारा येथील पोलिसांनी एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. ही माहिती मिळाल्याने नांदेड येथील तरोडा बुद्रुक विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ गेंदू देवके (वय ५७) यांच्यासह पोलीस नाईक रत्नसागर कदम, पोलीस कॉस्टेबल नातराव मुंडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ सोनसळे हे नांदेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून ट्रान्स्फर वॉरंट घेऊन व्यारा येथे पोहोचले. १७ डिसेंबरला दुपारी चार वाजता व्यारा येथील न्यायालयातून दोन्ही आरोपींचे ट्रान्स्फर वॉरंट घेऊन ते पोलीस वाहनाने नांदेडकडे निघाले. दोन्ही आरोपींच्या प्रत्येकी एका हाताला मिळून एक बेडी लावलेली होती. दोन्ही आरोपींना घेऊन पोलिसांचे वाहन १७ डिसेंबरला रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास नागपूर-सुरत महामार्गावरील धुळे तालुक्यातील वार-कुंडाणे शिवारात आले असता चालू वाहनात दोन्ही आरोपींनी अचानक पोलिसांवर त्यांच्याच काठीने हल्ला करत त्यांचे डोके फोडले. या झटापटीत दोन्ही आरोपींच्या हातातील बेडीही तुटली. यानंतरही झटापट सुरू असताना दोन्ही आरोपींनी दरवाजा उघडून वाहनातून पळ काढला. या घटनेनंतर नांदेडचे पोलीस उपनिरीक्षक देवके यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार धुळे शहर पोलीस, धुळे तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपींचा शोध घेण्यासाठी कुसुंबा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. परंतु, या शोध मोहिमेला यश येत नव्हते. त्यानंतर संशयित आरोपी धुळे तालुक्यातील मेहेरगाव, निमडाळे परिसरातच फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेत दोन्ही आरोपींचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करुन गावागावात जनजागृती केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी हे दोन्ही आरोपी लामकानी येथे असल्याची माहिती भरत वाघ, सुदाम माळी, सोनू माळी, पोलीस पाटील नितीन महाले व लामकानी गावातील काही सुजाण नागरिकांनी पोलिसांना कळवली. फरार झालेले हेच आरोपी असल्याची खात्री पटल्याने पोलिसांच्या विनंतीवरून लामकानी गावातील दक्ष नागरिकांनी आरोपींना ताब्यात घेतलं व तातडीने सोनगीर पोलिसांना कळवलं. त्यानंतर सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथकाने तातडीने लामकानी येथे जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या दोन्ही संशयितांची अधिक चौकशी केली असता दोघांवर धुळे शहर पोलीस ठाणे, धुळे तालुका पोलीस ठाणे, नांदेड विमानतळ पोलीस ठाणे, व्यारा पोलीस ठाणे, बदलापूर पोलीस ठाणे, राहाता पोलीस ठाणे, मनमाड शहर पोलीस ठाण्यांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. याशिवाय गुजरात, महाराष्ट्र व पंजाबमध्ये त्यांनी गुन्हे केल्याची माहिती आहे. दरम्यान, या आरोपींवर तिन्ही राज्यांत दाखल असलेले गुन्हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षख चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, सहाय्यक उपनिरीक्षक अजय सोनवणे, हवालदार फारुक शेख, पोलीस नाईक अमरिश सानप, कॉन्स्टेबल राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mFtlRp
No comments:
Post a Comment