: हडपसर येथील चंदूकाका ज्वेलर्स आणि पूना गाडगीळ यांच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने हातचलाखीने चांगलाच गंडा घातल्याचं सी.सी.टी.व्ही. फुटेजमधून समोर आलं आहे. पूनम परमेश्वर देवकर (वय ४२, रा. बिबवेवाडी) असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. () ही महिला काऊंटरवर येऊन तिथं असलेल्या व्यक्तीस सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यासाठी सांगत असे आणि त्या व्यक्तीचं लक्ष विचलित करून सोन्याच्या अंगठ्या हातात घालून बनावट अंगठ्या त्या जागी ठेवायची आणि तेथून पळ काढत असे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने या महिलेच्या कृत्याचा भांडाफोड झाला. तसंच चंदूकाका सराफ अँड सन्स व पूना गाडगीळ ज्वेलर्स यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनंतर गुन्ह्यांची माहिती घेतली असता नामांकित १२ ज्वेलर्सच्या दुकानात असा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या घटनांचे फुटेज मिळाल्यानंतर पडताळणी केली असता सारख्याच पद्धतीने या महिलेने हातचालखी करून सगळा प्रकार केला असल्याचं समोर स्पष्ट झालं. तपास करत असताना पोलिसांनी बिबवेवाडीमध्ये संशयित महिलेस तिचं नाव आणि पत्ता विचारला असता ती घाबरली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेले आणि तिची चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. या महिलेनं तब्बल १२ नामांकित सराफ दुकानातून अंगठ्या चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून ६ लाख २३ हजार २३८ रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, हडपसर हे करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32NZIGt
No comments:
Post a Comment