: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. ही ठिणगी पेटल्यास पक्षात आणखी एक नवा गट तयार होणार असल्याने पक्षप्रमुखांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. बँकेतील सत्ताधारी आघाडीविरोधात शिवसेनेने दंड थोपटत पॅनेलची घोषणा केली. मात्र, शिवसेनेचे राज्यमंत्री व माजी खासदार यांनी पक्षाऐवजी सत्ताधारी काँग्रेस आघाडीची उमेदवारी घेतल्याने या दोघांविरोधात तक्रारीचे बाण मारले जात आहेत. यामुळे या पक्षात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. () कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी पाच जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढण्यात येणार होती. त्यासाठी महिनाभर प्रयत्न सुरू होते. याच दरम्यान, भाजपचे आमदार प्रकाश आवाडे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हेदेखील सत्ताधारी आघाडीत येण्यासाठी चर्चा करत होते. दोन जागा देण्याच्या बदल्यात त्यांचा सहभाग निश्चित झाला. दुसरीकडे पाच जागांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला स्वीकृतसह तीन जागा देण्यास सत्ताधारी आघाडीने संमती दिली. पण हा तोडगा मान्य न झाल्याने शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडत शेकाप आणि आरपीआयला सोबत घेत स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. शिवसेनेनं पॅनेलची घोषणा केली असली तरी शिवसेनेत येऊन राज्यमंत्री झालेले यड्रावकर आणि शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री, माजी खासदार निवेदिता माने यांनी मात्र सत्ताधारी दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत राहणे पसंत केले. जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेतेच पक्षासोबत नसल्याचं यामुळे स्पष्ट झालं. यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव हे पॅनेलचा किल्ला लढवत असताना दुसरीकडे पक्षाचे दुसरे खासदार आणि मंत्री विरोधात आहेत. यामुळे मुळात अनेक गटात विभागले गेलेल्या पक्षात आणखी एक गट निर्माण होण्याचे संकेत स्पष्ट होत आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी यड्रावकर आणि माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, या दोघांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे. त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. राज्यात महाविकास आघाडी असताना शिवसेनेऐवजी बँकेत दोन्ही काँग्रेसने भाजपला जवळ करत आम्हाला धोका दिला आहे. संजय पवारांसह अनेकांनी टीकेची तोफ डागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यड्रावकर यांनी वडगाव बाजार समितीतही महाविकास आघाडीऐवजी भाजप आणि जनसुराज्य आघाडीसोबत राहणे पसंत केले. ही भूमिकादेखील पक्षाला खटकली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बँकेच्या निवडणुकीमुळे शिवसेनेत नवे वादळ निर्माण झाले आहे. पक्षप्रमुख या वादात लक्ष घालण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3JgESk0
No comments:
Post a Comment