Breaking

Friday, December 31, 2021

दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; रोहित अनफिट, बुमराला मिळाली मोठी जबाबदारी... https://ift.tt/3pK7xGw

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आज बीसीसीआयने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर झाल्यावर बऱ्याच जणांना धक्केही बसले आहेत. कारण या संघाची निवड करताना काही महत्वाचे खेळाडू संघाबाहेर राहिलेले आहेत, तर दुसरीकडे शिखर धवनसारख्या खेळाडूचे यावेळी संघात पुनरागमन झाले आहे. विराटकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण यावेळी नेतृत्वाच्या पहिल्या मालिकेत न खेळण्याची पाळी रोहित शर्मावर आली आहे. रोहित शर्मा हा पूर्णपणे फिट नसल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद यावेळी रोहितऐवजी लोकेश राहुलकडे देण्यात आलेले आहे. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुल हा भारताच्या संघाचा कर्णधार असेल. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी यावेळी जसप्रीत बुमराकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर या संघात मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूला स्थान देण्यात आलेले नाही. या संघात शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि लोकेश राहुल असे तीन सलामीवीर असतील. मधल्याफळीची जबाबदारी यावेळी विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर यांच्यावर असेल. या संघामध्ये दोन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रिषभ पंत आणि इशान किशन यांचा समावेश आहे. इशान किशनचा सलामीवीर म्हणूनही यावेळी संघाला फायदा होऊ शकतो. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा यावेळी जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. भारतीय संघात यावेळी आर. अश्विन, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकी गोलंदाजांचाही समावेश करण्यात आलेला आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना दुखापत झाली होती आणि ते बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होते. पण हे दोघेही अजूनपर्यंत फिट नसल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार संघाची निवड करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sKbtIX

No comments:

Post a Comment