औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळूबा मनगटे (वय ६०) यांचा मंगळवारी (ता.२८ ) रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कोयत्याने शरीरावर सपासप वार करुन हत्या केली. या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जगन्नाथ मनगटे यांच्या भावकीतील कारभारी कौतिक मनगटे यांच्या मुलीचे लग्न गावात होते. त्यासाठी जगन्नाथ मनगटे हे सहपरिवार गावात आले होते. लग्न लावून ते आपल्या गावालगतच्या शेतातील घरी रात्री एकटेच जात होते. लोहगाव- बरकतपुर रस्त्यावरून शेतातील घराकडे जात असताना, गावापासून पाचशे ते सहाशे फुटावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयता व धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यावर, तोंडावर, पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. काही वेळा नंतर पाठीमागून घराकडे परतणाऱ्या त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाई मनगटे यांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोपी पडलेली दिसली. टोपी रक्ताने माखलेली होती. त्यांना काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना आपले पती रक्ताच्या थारोळ्यात खोल खड्ड्यात गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ आपल्या पतीला योगेश संजय मनगटे आणि मच्छिंद्र मनगटे यांच्या मदतीने सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून म्रुत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता काहीच हाती लागले नाही. सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, मात्र त्यातूनही आरोपीचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HjDX09
No comments:
Post a Comment