Breaking

Thursday, January 13, 2022

संतापजनक! रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने महिलेने रस्त्याच्या कडेलाच दिला बाळाला जन्म https://ift.tt/3zVXotv

: ग्रामीण रुग्णालयाने महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने संबंधित महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. देवळाली प्रवरा येथील रहिवासी कमल अरुण शिंदे या गरोदर महिलेला गुरुवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पती अरुण यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तेथे गेल्यानंतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कमल यांच्या शरीरात रक्त कमी असल्याने त्यांना दाखल करता येणार नाही, असं सांगितलं. कमल यांची परिस्थिती बघून अरुण शिंदे हे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्नीला दाखल करून घेण्यासाठी विनवणी करत होते. मात्र देवळाली ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने हतबल झालेल्या पतीने अखेर कमल हिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. अरुण आणि कमल हे कडाक्याच्या थंडीत पायी-पायी खासगी रुग्णालयाकडे निघाले. वाटेत कमल लघुशंका करण्यासाठी थांबल्या असतानाच त्यांना प्रसूतीवेदना असह्य झाल्याने नगरपालिकेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या भिंतीच्या कडेला त्यांनी आसरा घेतला. ही बाब आजूबाजूला राहणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत साडीच्या साहाय्याने आडोसा बनवला आणि त्या महिलांनीच कमल यांची प्रसूती केली. घटनेची माहिती मिळताच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. शिंदे कुटुंबियांना मदत करत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. ग्रामीण रुग्णालयाचे नर्स आणि कर्मचारी हे देखील घटनास्थळी पोहचले. पुढील उपचारासाठी कमल आणि तिच्या बाळाला त्याच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरीब कुटुंबावर अशी परिस्थिती ओढवल्याने माध्यमांसमोर बोलण्यास ते धजावत नसले तरी आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी हा घटनाक्रम कथन करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. एखाद्या माता भगिनीवर अशी वेळ येत असेल तर यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. आज या आरोग्य केंद्रात जेवढे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी असतील त्यांचे निलंबन करण्यात यावं,' अशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले कमल शिंदे ही महिला पोटात दुखत असल्याने ग्रामीण रुग्णालयात आली होती. मात्र तिच्याकडील कागदपत्रांच्या आधारे तिची प्रसूतीची तारीख ही फेब्रुवारी महिन्यातील असल्याचं निदर्शनास आले. तसंच तिला प्रसूती कळादेखील होत नव्हत्या. मात्र शिंदे कुटुंबीय कोमल हिला दाखल करून घेण्यासाठी अडून बसले होते. त्यामुळे तिला नर्सने घरी जाऊन काहीतरी खाऊन यायला सांगितलं. मात्र वाटेतच तिची प्रसूती झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ नर्स यांनी घटनास्थळी जाऊन स्वतः संबंधीत केल्याचा दावा देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अण्णासाहेब मासाळ यांनी केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HTT3Ki

No comments:

Post a Comment