Breaking

Thursday, January 13, 2022

शेतकऱ्याच्या लेकीचा UPSC परीक्षेत डंका, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं https://ift.tt/34Q9oS3

बीड : नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत, पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालण्याची किमया बीड जिल्ह्यातील शेतकरी कन्येने केलीय. श्रद्धा नवनाथ शिंदे हिने युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ३६ वी रँक मिळवित यश संपादन केलंय. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे दशकानुदशके बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता जिल्ह्यातून अनेक अधिकारी घडू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रद्धा नवनाथ शिंदे हिने यूपीएससी परीक्षा देत परीक्षेत 36 रँक घेऊन कुटुंबासह बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. श्रद्धा सामान्य कुटुंबातून येते. घरात कोणताही शिकलेल्या वारसा नसताना आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास तिने पूर्ण केला आहे. श्रद्धा मूळची बीडची.. तिचे वडील शेतकरी असले तरी श्रद्धाने मोठं साहेब होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आपल्या पद्धतीने जशी माहिती मिळाली आणि जसे लोक भेटले त्यातून मार्ग काढला. तिचे प्राथमिक शिक्षण बीडमध्ये झालं आणि कॉलेजचं शिक्षण बलभीम कॉलेजमध्ये झालं. बलभीम कॉलेजच्या नंतर तिने थेट औरंगाबाद गाठलं आणि तिथं इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. आपल्याला मोठा अधिकारी बनायचं हे स्वप्न तिनं पाहिलं होतं आणि त्याला गवसणी घालण्याचा इंजिनिअरिंग हा पहिला टप्पा होता. इंजिनीरिंगमध्ये अनेकांचे मार्गदर्शन मिळालं आणि त्यातच तिने इंजीनियरिंगची डिग्री पूर्ण करेपर्यंत आपल्या विभागाद्वारेदेखील आयएएस अधिकारी होता येतं, ही माहिती तिला कळाली. डिग्री पूर्ण होत असताना दिल्लीमध्ये जाऊन तिने शिकवणी वर्ग लावला. काही महिने तंतोतंत १० तास अभ्यास केला. अखेर यशाने श्रद्धासमोर पिंगा घातलाच...! श्रद्धा पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाली. शेतकर्‍याच्या मुलीने अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आज अधिकारी झाल्यानंतर तिला जिल्हाभरातून अनेकांचे कौतुकाचे फोन येतायेत. तर तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक वाटतंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nnTkxl

No comments:

Post a Comment