औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून शिवजयंती महोत्सव समितीकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, महाराजांप्रती महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत असल्याचा आरोप या समितीने केला आहे. तर शिवप्रेमींच्या भावनांचा स्फोट होऊ देऊ नका असा इशाराही यावेळी दिला आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर कसं तरी घाई-घाईने यावेळी स्मारकाचे काम पूर्ण करत महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. पण पुतळ्याचे लोकार्पण कधी आणि कुणाच्या हस्ते करायचे, याबाबत शिवप्रेमींची काय इच्छा आहे, तसेच महानगरपालिकेचे काय नियोजन आहे यावर पालिका प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. सर्व काही छुप्या पद्धतीने सुरू आहे. त्यात प्रशासक असल्याने प्रशासक मनमानी मनमानी करत असल्याचं शिवजयंती महोत्सव समितीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाचे काय नियोजन चालू आहे याविषयी सस्पेन्स बनवून ठेवला असून, यामुळे सर्व शिवप्रेमी संभ्रमात आहेत. तर महाराजांच्या ह्या स्मारकासोबत शहरवासियांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे अनावरणाविषयी शिवप्रेमींच्या भावना खूप तीव्र असून, ह्या भावनांचा स्फोट होण्याअगोदर महापालिका प्रशासकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना अथवा शिवप्रेमींना त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल सांगावे, अशीही मागणी शिवजयंती महोत्सव समितीकडून करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/v62dYOD
No comments:
Post a Comment