Breaking

Thursday, February 24, 2022

मुंबई पोलिसांना हादरवणाऱ्या अँटिलिया प्रकरणाची वर्षपूर्ती; मात्र गूढ गुलदस्त्यातच https://ift.tt/IbZCNH2

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबई पोलिस दलाचा नावलौकिक धुळीस मिळविणाऱ्या अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन हत्याकांड प्रकरणाला आज, २५ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरानंतरही या दोन्ही प्रकरणातील बरेच काही अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 'सुपर कॉप' बनण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी सचिन वाझे आणि कंपनीने हे कांड रचले होते, असे 'एनआयए'च्या तपासातून पुढे आले असले, तरी पैसे कुणाकडून उकळण्यात येणार होते? जिलेटीनच्या कांड्या नेमक्या आणल्या कुठून? हा कट वाझे आणि इतर पोलिसांपुरताच होता का अन्य बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे? मनसुख हिरन यांची हत्या का करण्यात आली? यांसारख्या अनेक बाबी अद्याप अस्पष्टच आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवून त्यांना धमकाविण्यात आले. एक निनावी चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान ही कार ठाणे येथील व्यावसायिक मनसुख हिरन यांची असल्याचे समोर आले. तपासादरम्यान मनसुख हिरन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीजवळ सापडला आणि एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र एटीएसने याप्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच, स्फोटके सापडल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास 'एनआयए'कडे देण्यात आला. 'एनआयए'ने माजी पोलिस सहायक आयुक्त प्रदीप शर्मा तसेच सचिन वाझे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात परमबीर सिंह, उपायुक्त पराग मणेरे यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. 'एनआयए'ने याप्रकरणात आरोपी पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली, आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. मात्र, अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे म्हटले जात आहे. वाझे यांनी त्यांचे साथीदार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हे सर्व करीत होते. इतकेच नाही तर या कृत्यानंतर प्रत्येक घडामोडींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवत होते. त्यामुळे या अधिकऱ्यांवरही संशयाची सुई अजूनही असून त्यांचा सहभाग नेमका काय होता हे स्पष्ट झालेले नाही. यापैकी काही अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला काहीच बोलायचे नाही अँटिलियाजवळ ज्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या ती कार मनसुख हिरन यांची होती. या घटनेनंतर त्यांचा यामध्ये नाहक बळी घेण्यात आला. याबाबत मनसुख याचा मुलगा मित याच्याशी संपर्क साधला असता, याबाबत आम्हाला आता काहीच बोलायचे नसल्याचे तो म्हणाला. वर्षभर आम्ही खूप वेदना सहन केल्या अनेक अडचणींचा सामना करून आम्ही यातून सावरलोय. आता यावर कोणतेच भाष्य करायचे नसल्याचे तो म्हणाला. पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्ष हे एक वर्ष मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे ठरले. स्फोटके आणि हत्येच्या कटामध्ये चार पोलिस आणि एक माजी पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्याने पोलिसांकडे सर्वच संशयाच्या नजरेने पाहू लागले. या चारही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर मुंबई पोलिस दलामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली. गुन्हे शाखेतील कर्तव्यदक्ष, खबऱ्यांचे जाळे, उत्कृष्ट तपास कौशल्य असलेल्या ६५ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. या प्रकरणानंतर परमबीर सिंह आणि इतर अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले. याच वर्षात परमबीर आणि पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांना निलंबित करण्यात आले. २५ फेब्रुवारी : अँटिलियाजवळ जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडली ५ मार्च : स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरन याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. ७ मार्च : गुन्हा दाखल करून महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला ९मार्च : अँटिलियाजवळ स्फोटके प्रकरण : मनसुख हिरनसह स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग १३ मार्च : अँटिलियाप्रकरणी सचिन वाझेची १२ तास चौकशी व अटक १६ ते १९ मार्च : एनआयएकडून अँटिलिया प्रकरणाच्या तपासाला वेग. मनसुख हिरन यांच्या पत्नीची भेट, वाझेच्या कार्यालयातील दस्तावेजांचा तपास, गुन्ह्याचे नाटकीय सादरीकरण २४ मार्च : वाझेविरोधात बेकायदेशीर कृत्याचा गुन्हा दाखल ३० मार्च : सचिन वाझेच्या विविध गाड्या हुडकून जप्त. स्फोटके कुठून आणले, याचा तपास सुरू ४ एप्रिल : सचिन वाझे प्रकरण : सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला अटक २३ एप्रिल : हिरन हत्या प्रकरण : वाझेचे मित्र निरीक्षक सुनील मानेला अटक २६ एप्रिल : सुनील मानेची गाडी जप्त ११ मे : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे बडतर्फ २१ मे : सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी बडतर्फ १ जून : पोलिस निरीक्षक सुनील माने बडतर्फ २५ मे : काॅन्स्टेबल विनायक शिंदे बडतर्फ १७ जून : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक ३ सप्टेंबर : सचिन वाझेविरुद्ध आरोपपत्र. माजी सहायक आयुक्त प्रदीप शर्मांसह दहा आरोपी. निलंबित पोलिस सह निरीक्षक रियाझुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गौर, संतोष शेलार, सतीश मोठकुरी, मनिष सोनी व आनंद जाधव यांचा समावेश


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wXJDfmR

No comments:

Post a Comment