रवी राऊत/यवतमाळ : भूतबाधा दूर करण्याचा बनाव निर्माण करीत एका विवाहितेवर आदिलाबादच्या मांत्रिकाने पाशवी अत्याचार केला. समाजमन सुन्न करणारी ही घटना गुरुवार २७ तारखेला नागपूर मार्गावरील एका वसाहतीत घडली. या प्रकरणी शेखर अण्णा नामक आदिलाबाद येथील एका बाबावर यवतमाळ शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील २३ वर्षीय तरुणी नेहमी चिडचिड करीत होती. तिची मानसिकता ठीक राहत नव्हती. अशात एका ओळखीच्या व्यक्तीने आदिलाबाद येथील शेखर अण्णा हा तांत्रिक असून भूत काढतो असे सांगितले. त्यानंतर २३ जानेवारीला बोलावण्यावरून तो शेखर अण्णा दोन साथीदारांना घेऊन यवतमाळात आला. दरम्यान निंबू कापून त्या तरुणीवर उपचार करण्याचे नाटक केले. त्यानंतर चार ते पाच दिवस त्या शेखर अण्णाने त्याच्या दोन साथीदारांचा मदतीने भूत काढण्यासाठी उपचार केले. दरम्यान २८ जानेवारीला शेखर अण्णा त्या तरुणीच्या नातेवाईकांना म्हणाला की, शैतान मेरेसे बहुत शक्तीशाली है, असे म्हणून तरुणीला एकटं त्याच्याजवळ ठेवण्यास कुटुंबीयांवर दबाव आणला. कुटुंबीय त्यांच्या बहकाव्यात आल्याने त्यांनी तरुणीला शेखर अण्णा याच्याजवळ ठेवले. यावेळी तरुणी एकटी असल्याचा फायदा घेऊन शेखर अण्णा याने अंगातील भूत काढण्याचे नाटक करून त्या तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरी अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरून होती, दुसऱ्या दिवशी शेखर अण्णा त्याच्या दोन साथीदारासोबत आदिलाबाद निघून गेला. त्यावेळी घडलेला प्रकार त्या तरुणीने कुटुंबियांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुटुंबीयांनी थेट यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या शेखर अण्णा नामक व्यक्तीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/06pjMcgfa
No comments:
Post a Comment