मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या अचानक जाण्यामुळे क्रिकेट विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अनेक खेळाडू वॉर्नसोबतच्या आठवणी शेअर करत आहेत. भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगनेही वॉर्नशी संबंधित एक किस्सा सांगितला, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. वॉर्नने युवा क्रिकेटपटूंच्या एका पिढीला विशेषत: फिरकी गोलंदाजांना खेळात सामील होण्यासाठी प्रेरित केले. हा सर्वकालीन महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. अनेकजण त्याला आजही रोल मॉडेल समजतात. २००१ च्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत आपल्या रोल मॉडेल सोबत खेळण्याचे स्वप्न भज्जीने पूर्ण केले होते. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर शेन वॉर्नला बाद करत हरभजनने हॅट्रिक पूर्ण केली होती, आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. कोलकाता कसोटीत १७१ धावांनी विजय मिळवून भारताने मालिका बरोबरीत आणली होती. चेन्नईत अंतिम सामना होणार होता. हरभजन सिंगच्या पुस्तकात आहे हा किस्सा ब्रेट लीच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना म्हणाला, 'मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याचा मी माझ्या पुस्तकात विशेष उल्लेख केला आहे. पुस्तक तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे. २००१ मध्ये मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२ विकेट घेतल्या होत्या. तेव्हा मालिकेत मी वॉर्नला फार कमी वेळा भेटलो होतो. चेन्नईतील तिसऱ्या कसोटी सामन्यात तो स्टीव्ह वॉसोबत फलंदाजी करत होता आणि नॉन-स्ट्रायकर एंडला उभा होता. हरभजन पुढे म्हणाला, 'जेव्हा मी माझ्या रनअपवर उभा होतो, तेव्हा मी त्याच्याकडे पाहत होतो. आणि मी त्याच्याकडे बघत असताना त्याने मला विचारले, काय झालं, तू असा काय पाहात आहेस? गोष्ट हाताबाहेर जाण्यापूर्वीच मी स्पष्टीकरण दिले. हा माझ्यासाठी एक फॅनबॉय क्षण आहे आणि वॉर्नबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.' भज्जी म्हणाला, 'म्हणून मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, हे बघ मित्रा, मी फक्त माझ्याजवळ उभ्या असलेल्या माझ्या हिरोकडे पाहत आहे. तुला असे खेळताना पाहणे हे माझे स्वप्न होते. आणि मी तुझ्यासोबत खेळत आहे, माझ्यासाठी हा खूप छान क्षण आहे. मी शेन वॉर्नसोबत खेळतोय, हा क्षण मला जगायचा आहे.' त्यानंतर शेन वॉर्नने मला धन्यवाद म्हटले होते. तेव्हापासून आमच्यात चांगले नाते निर्माण झाले. ३२ विकेट घेतल्यानंतर वॉर्न माझ्याकडे आला होता, माझे अभिनंदन करताना तो म्हणाला की, 'खूप छान मित्रा.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X2aeOUZ
No comments:
Post a Comment