मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने बाजी मारली. दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने गुजरातपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातच्या राहुल तेवातियाने अखेरपर्यंत गुजरातचा किल्ला लढवला आणि त्यांना पाच विकेट्स राखून पहिला विजय मिळवून दिला. राहुलने यावेळी २४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ४० धावा केल्या. लखनौच्या १५९ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर गुजरातला शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला, गिलला यावेळी भोपळाही फोडता आली नाही. त्यानंतर दुसऱ्याच षटकात गुजरातला अजून एक धक्का बसला. दुसऱ्या षटकात विजय शंकर चार धावांवर बाद झाला आणि गुजरातची २ बाद १५ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी गुजरातला या पडझडीमधून बाहेर काढले ते कर्णधार हार्दिक पंड्याने. पण यावेळी हार्दिकची विकेट त्याचा भाऊ कृणालनेच काढल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने यावेळी २८ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३३ धावा केल्या. हार्दिक बाद झाल्यावर गुजरातची धावसंख्या संथ झाल्याचे पाहायला मिळाली. तत्पूर्वी, गुजरातचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला बाद केले आणि गुजरातच्या संघाला मोठे यश मिळवून दिले. भोपळाही न फोडता राहुलला यावेळी माघारी परतावे लागले. पण शमी फक्त एवढ्यावर थांबला नाही. तर शमीने त्यानंतर क्विंटन डीकॉक (७) आणि मनीष पांडे (६) यांना झटपट बाद करत लखनौला एकामागून एक तीन धक्के दिले. यामध्ये शमीला मदत केली ती वेगवान गोलंदाज वरुण आरोनने. कारण आरोनने यावेळी लखनौच्या इव्हिन लुईसलाही लवकर बाद केले आणि त्यामुळेच लखनौची पहिल्याच सामन्यात ४ बाद २९ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण यावेळी दीपक हुडा लखनौच्या संघासाठी धावून आला. हुडाने यावेळी ४१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच लखनौच्या संघाला शंभरी गाठता आली. दीपकने यावेळी आयुष बदोनीबरोबर पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. आयुषने ४१ चेंडूंत ५४ धावा साकारल्या. या दोन अर्धशतकांच्या जोरावर लखनौच्या संघाला गुजरातपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवता आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LMEnb1N
No comments:
Post a Comment