Breaking

Wednesday, April 27, 2022

थरारक... अखेरच्या चेंडूवर षटकात लगावत गुजरातचा हैदराबावर अनपेक्षित विजय,रशिद खानने करून दाखवलं... https://ift.tt/S3i0w8C

मुंबई : गुजरातला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर ९ धावांची गरज होती. त्यावेळी हैदराबादचा संघ हा सामना जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण रशिद खानने अखेरच्या दोन्ही चेंडूवर षटकार लगावले आणि संघाला ५ विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला. हैदराबादने अभिषेक वर्मा आणि एडन मार्करम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर १९५ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या वृद्धिमान साहाने ३८ चेंडूंत ६८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यानंतर गुजरात जिंकेल, असे कोणाला वाटत नव्हते. पण रशिद आणि राहुल तेवातिया यांनी अखेरच्या षटकांत २५ धावा फटकावल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादच्या १९६ धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवाात चांगली झाली नाही. शुभमन गिल (२२) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (१०) हे यावेळी लवकर बाद झाले. पण त्यानंतर गुजरातच्या संघाला विजयाची आस दाखवली ती सलामीवीर वृद्धिमान साहाने. हैदराबादच्या गोलंदाजीचा खरपूर समाचार घेत साहाने यावेळी फक्त ३८ चेंडूंत ११ चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर ६८ धावांची आक्रमक खेळी साकारली. पण उमरान मलिकच्या गोलंदाजीपुढे यावेळी गुजरातचा निभाव लागला नाही,असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात हा सामना फिरला. तत्पूर्वी, अभिषेक वर्मा आणि एडन मार्करम यांनी अर्धशतके झळकावत हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. कर्णधार केन विल्यम्सनच्या रुपात यावेळी हैदराबादला पहिला धक्का बसला. केनला यावेळी पाच धावा करता आल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठीच्या रुपात हैदराबादला अजून एक धक्का बसला. तिसऱ्या स्थानावर आलेल्या राहुल त्रिपाठीला यावेळी गुजरातच्या मोहम्मद शमीने बाद केले. राहुलने यावेळी १० चेंडूंत १६ धावा केल्या. हैदराबादच्या संघाला हे एकामागून एक दोन धक्के बसले होते. पण त्यावेळी हैदराबादच्या संघाला सावरले ते अभिषेक वर्माने. अभिषेकने सुरुवातीला संयतपणे खेळ केला, पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने धडाकेबाज फटकेबाजी सुरु केली. अभिषेक वर्माने षटकारासह आपले अर्धशतक दमदार षटकार लगावत ३३ चेंडूंत साकारले. यावेळी वर्माला चांगली साथ मिळाली ती एडन मार्करमची. अभिषेक आणि एडन यांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची मोलाची भागीदारी रचली. अर्धशतक झळकावल्यावर अभिषेकला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. अर्धशतक झळकावत हैदराबादच्या धावसंख्येला वर्माने चांगला आकार दिला. वर्माने यावेळी ४२ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६५ धावा केल्या. अभिषेक बाद झाला ती एडन जोरदार फटकेबाजी करत होता. एडननेही यावेळी दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर मोठी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नांमध्ये एडन बाद झाला.एडनने यावेळी ४० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. अभिषेक आणि एडन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादला १९५ धावा उभारता आल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/daNV0jU

No comments:

Post a Comment