वृत्तसंस्था, ताश्कंद/बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकचे बीजिंगमध्ये यशस्वी संयोजन झाल्यानंतर तीन महिन्यांतच चीनमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियाड) लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणारी ही स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ही स्पर्धा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार होती. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने स्पर्धा लांबणीवर टाकली असल्याची घोषणा केली; पण नव्या तारखांचा निर्णय चीन ऑलिम्पिक समिती आणि स्पर्धा समितीसह चर्चा केल्यानंतरच होईल, असे स्पष्ट केले. स्पर्धा संयोजन समितीने आशियाई क्रीडा स्पर्धा ठरलेल्या कार्यक्रमानुसार घेण्याची तयारी दाखवली होती; मात्र करोनाची स्थिती, स्पर्धेची मोठी व्याप्ती याचा विचार करून ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे ठरले असल्याचेही आशियाई ऑलिम्पिक परिषदेने सांगितले. परिषदेच्या ताश्कंद येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यामागे चीनमध्ये या वर्षातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी असल्याचे सांगण्यात येत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा होणार असलेले हांगझाऊ हे शांघायपासून १७७ किलोमीटर दूर आहे. शांघायमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे चीनच्या राजधानीत चिंतेचे वातावरण आहे. काही महिन्यांत चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन होणार आहे. त्या वेळी देशात कोणतीही अस्थिरता किंवा चिंतेचे वातावरण असू नये हा प्रयत्न आहे. त्यामुळेच कदाचीत चीनमधील दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकली असल्याचे वृत्त देण्यात आले आहे. स्पर्धेची व्याप्ती आशियाई क्रीडा स्पर्धेत ६१ क्रीडा प्रकारांत अकरा हजारहून जास्त खेळाडूंचा सहभाग असतो. ही संख्या ऑलिम्पिकमधील खेळाडूंपेक्षा जास्त आहे. या स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेतल्यास ऑलिम्पिकखालोखाल देशांचा सहभाग असतो. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये तीन हजारच्या आसपास खेळाडूच असतात. त्यामुळे त्याचे संयोजन आशियाई क्रीडा स्पर्धापेक्षा सोपे असते, असेही सांगितले जात आहे. विद्यापीठ स्पर्धाही लांबणीवर जागतिक विद्यापीठ स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. मूळ कार्यक्रमानुसार या स्पर्धा गत वर्षी होणार होत्या. या स्पर्धा २६ जून ते ७ जुलै या कालावधीत चीनमधील चेंगदू येथे होणार होत्या. मात्र, आता ही स्पर्धा २०२३ पर्यंत लांबणीवर टाकली असल्याचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघाने जाहीर केले आहे. सध्याची अनिश्चितता लक्षात घेऊन हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले आहे. चीनमधील स्पर्धांच धोक्यात - आशियाई युवा स्पर्धा (२० ते २८ डिसेंबर, शँतोउ-चीन) रद्द. - चीनमधील दोन डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धा - या दोन स्पर्धांऐवजी पोलंडमध्ये अतिरीक्त स्पर्धा - चीनमध्ये शुक्रवारी करोनाचे नवे ४ हजार ६२८ रुग्ण आढळले - सध्या शांघाय परिसरात सर्वाधिक रुग्ण ----------
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HUDiSxe
No comments:
Post a Comment