Breaking

Saturday, May 7, 2022

कपडे धुवायला गेले अन् खदानीत बुडाले; डोंबिवलीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू https://ift.tt/F8mvGDL

प्रदीप भणगे, डोंबिवली: डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा ,भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. आज सायंकाळच्या सुमारास देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड, त्यांची सून अपेक्षा गायकवाड, नातू मोक्ष, निलेश आणि मयुरेश हे पाचही जण दगड खाणीतील पाणवठ्यावर सायंकाळी कपडे घेण्यासाठी आले होते. या पाचही जणांचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या पाच जणांमधील एक जण बुडत असावा व त्यांना वाचवण्यासाठी उर्वरित चार जण पुढे आले व या प्रयत्नात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत .अपेक्षा गायकवाड (वय ३०) ,मीरा गायकवाड (वय ५५) ,मयुरेश गायकवाड (वय १५) , मोक्ष गायकवाड (वय १३) ,निलेश गायकवाड (वय १५) अशी मयताची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. पाचही जणांचे मृतदेह रात्री आठ वाजेपर्यंत शोधून काढण्यात आले. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे देसलेपाडा परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Caot7FM

No comments:

Post a Comment