हिंगोली : हिंगोली शहरातील एका महिलेचे इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीसह विदर्भातील अन्य दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील एका महिलेच्या वापरात असलेल्या इंस्टाग्राम व व्हाट्सअप वर लक्ष ठेवून अनोळखी व्यक्तीने अश्लील इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. त्यानंतर सदर महिलेचे छायाचित्र त्या अकाउंटवर टाकून अश्लील संदेश लिहून सोशल माध्यमाद्वारे महिलेची बदनामी केली. त्यानंतर पुसद येथील आकाश लोखंडे व अन्य दोघांनी इंस्टाग्राम वरील अश्लील छायाचित्र त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवून अश्लील भाषेत संदेश लिहिला. सदर प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुसद येथील आकाश लोखंडे याच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्याने महिलेशी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच स्वतः विषारी औषध प्राशन करून तुमचे नाव घेतो अशा धमक्याही दिल्या. या प्रकारानंतर सदर महिलेने आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी आकाश लोखंडे यांच्यासह अन्य दोघांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ci52oYx
No comments:
Post a Comment