उस्मानाबाद : राज्यसभेचे माजी खासदार () सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्यात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. तुळजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा पाहायला मिळाली. संभाजीराजेंना अशा प्रकारची वागणूक दिल्याप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाकडून उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. समस्त तुळजापूरकर आणि सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे सह जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे आणि मंदिराचे व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना मंदिराच्या गर्भगृहात चुकीची माहिती देऊन प्रवेश दिला नाही. तसेच त्यांनी संभाजीराजेंना अपमानास्पद वागणूक दिल्याने वरील दोन्ही अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्यासाठी तुळजापूर शहरवासिय, पुजारी, व्यापारी, शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटना यांच्याकडून उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्रक काढण्यात आले आहे. नक्की प्रकरण काय? छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळच्या सुमारास ते कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले. तिथे त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कुठलासा नियम सांगत व्यवस्थापनाने संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. राजेंना प्रवेश नाकारल्यापासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची दिलगिरी छत्रपती संभाजी राजे यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू किंवा कृती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कवायत कलम ३६ नुसार कुळाचार विधी व्यतिरिक्त कमाविसदार पुजारी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असा नियम आहे. करवीर संस्थान व संभाजीराजे छत्रपती यांच्या कालच्या गैरसोयीच्या कारणाने शासनाला कलम ३६ आणि उच्च न्यायालयातील प्रकरणाबद्दल सरकारकडे अहवाल पाठवला जात आहे. करवीर संस्थांनची मानाची पूजा छत्रपती संभाजीराजे यांच्या आगमनापूर्वी झालेली होती. यानंतर ते दर्शनाला येणार असतील तेव्हा करवीर संस्थानचा अभिषेक त्यांचे आगमन पाहून करावे, जेणेकरून त्यांचे हस्ते दुग्ध अभिषेक होईल, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत. करवीर संस्थान हे तुळजाभवानी मंदिराचे मानकरी असून त्यांचा मान ठेवणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य आहे. याबाबत कृपया कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये. याबाबत तांत्रिक कारणाने नैमित्तिक कुळाचाराला बाधा येऊ नये यासाठी नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापक यांनी करवीर संस्थानच्या प्रतिनिधींशी चर्चा करून यापुढे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत, असं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VTJUwby
No comments:
Post a Comment