Breaking

Monday, May 23, 2022

पुजा वस्त्रकारने केले ट्रेलबेझर्स संघाचे वस्त्रहरण, सुपरनोव्हासचा दणदणीत विजय https://ift.tt/OZUjaKS

पुणे : सुपरनोव्हास संघाच्या पुजा वस्त्रकारने ४ षटकांत फक्त १२ धावा देत चार विकेट्स पटकावले आणि ट्रेलबेझर्सचे वस्त्रहरण केल्याचे पाहायला मिळाले. सुपरनोव्हासने ट्रेलबेझर्स संघापुढे विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पुजाने अचूक आणि भेदक मारा करत सुपरनोव्हासला महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत ४९ धावांनी विजय मिळवून दिला. सुपरनोव्हासच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेलबेझर्स संघाला सुपरनोव्हासच्या पुजा वस्त्रकारने चांगलेच कंबरडे मोडले. आपल्या पहिल्या तीन षटकांमध्ये पुजाने फक्त ११ धावा दिल्या आणि ट्रेलबेझर्सच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे ट्रेलबेझर्सच्या संघाची ३ बाद ६५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सुपरनोव्हासच्या गोलंदाजांनी ट्रेलबेझर्स संघाला अजून अडचणीत आणले. कारण त्यानंतर फक्त सात धावांमध्ये सुपरनोव्हास संघाने ट्रेलबेझर्सच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यांनी ६ बाद ७२ अशी अवस्था केली. त्यानंतर पुजाने अजून एक विकेट मिळवली आणि आपला चौथा बळी टिपला. सुपनोव्हास संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोव्हास संघाकडून कोणालाही अर्धशतक झळकावता आले नाही. पण फलंदाजांनी यावेळी उपयुक्त फलंदाजी करत १६३ धावा फटकाववल्या होत्या. सुपरनोव्हास संघाला यावेळी दमदार सलामी मिळाली. दिएंद्रा डॉटिन्स आणि प्रिया पुनिया यांनी यावेळी ५० धावांची सलामी दिली. पण त्यानंतर डॉटिन ३२ धावांवर असताना धावचीत झाली आणि सुपरनोव्हासला पहिला धक्का बसला. डॉटिन बाद झाल्यावर काही वेळातच प्रियादेखील चुकीचा फटका मारून तंबूत परतली, तिला २२ धावा करता आल्या. त्यावेळी सुपरनोव्हासची २ बाद ६३ अशी स्थिती होती. त्यानंतर हरलीन देओलने धडाकेबाज फटकेबाजी करत सर्वांची मनं जिंकून घेतली. हरलीनने यावेळी १९ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ३५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. हरलीन फटकेबाजी करत असताना कर्णधार हरमनप्रीत संयमीपणे खेळत होती. पण हरलीन बाद झाल्यावर मात्र हरमनप्रीतने आपल्या पोतडीतील सर्व फटके बाहेर काढले आणि ट्रेलबेझर्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. हरमनप्रीतने यावेळी २९ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर ३७ धावांची खेळी साकारली आणि सुपरनोव्हास संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. त्यामुळेच सुपरनोव्हास संघाला १५० धावांचा टप्पा गाठता आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/np93cxs

No comments:

Post a Comment