जळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल कैद्यांना मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मोकळीक देणे ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या घटनेस जबाबदार तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबित केले आहे. एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पंडीतराव ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल पारस नरेंद्र बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल किरण अशोक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पुरुषोत्तम कोळी, अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील दशरथ बुधा महाजन रा.एरंडोल, सतीश मिलिंद गायकवाड रा. आंबेडकर नगर, जळगाव यांच्यासह पाच कैदी जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात दाखल झाले होते. रविवारी रात्री यापैकी दशरथ महाजन व सतीश गायकवाड दोन कैद्यांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. भांडण करणाऱ्यांना शांत करण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल राजेश कोळी हे चावीने दरवाजा उघडून आत गेले. त्यावेळी आरोपी सतिष गायकवाड याने पोलिस कर्मचारी राजेश कोळी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. 'तु आमच्या वादात पडू नको नाहीतर चाकूने तुझा मर्डर करुन टाकेन', अशी धमकी सतीष गायकवाड याने पोलिस कर्मचारी कोळी यांना दिली होती. तसेच कर्मचाऱ्याला लोटून दिले होते. याप्रकरणाने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भितीने रुग्ण तसेच कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत सुटले होते. घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर फौजफाटा बोलवावा लागला होता. या घटनेची पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गांभिर्याने दखल घेतली तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस कर्मचारी सतीश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी जिल्हापेठ पोलिसात कैदी सतिष मिलींद गायकवाड व त्याचे इतर मित्र आणी नातेवाईक अशांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह इतर मुभा दिल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात घटनेच्या दिवशी कर्तव्य बजावणारे चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नियुक्त करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qgCeL3H
No comments:
Post a Comment