Breaking

Friday, May 20, 2022

Video : पुण्यातल्या लाल महालात लावणीचं शुटिंग, संभाजी ब्रिगेड संतापली https://ift.tt/sSjNWdt

पुणे : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात लावणीचं शुटिंग झालंय. दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी थिरकताना दिसत आहे. महालातील मध्यवर्ती ठिकाणी संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करत असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. या साऱ्या प्रकारावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, ज्या लाल महालात राहून शिवाजी महाराजांनी कोंढणा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, त्याच लाल महालात लावणीचं शुटिंग पार पडलंय. सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जातोय. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आलंय. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये लावणी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड संतापली महानगर पालिकेने बंद ठेवला. मात्र तिथे चित्रपटातील गाण्यांवर, तमाशातील गाण्यांवर डान्स करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. इतकी वाईट अवस्था लाल महालाची झाली आहे. महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर असं बिभत्स पद्धतीने गाणं वाजवलं जातं, डान्स केला जातो. मला पुण्याच्या पोलिस आयुक्तांना विनंती करायचीय, तुम्ही जातीने लक्ष घालून फरासखाना पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TAkeGuD

No comments:

Post a Comment