कोलकाता : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी देशभर मुस्लीम समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुस्लीम समाज नुपूर शर्मां यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. तर, भाजपनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. नुपूर शर्मा यांच्यावरील कारवाईसाठी सुरु असलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये हावडा आणि मुर्शिदाबादनंतर भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात रविवारी नादियामध्ये निदर्शने करण्यात आली. नादियातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी लोकल ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका समुहाकडून मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत होता. आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला होता, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यानं दिली. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन उभ्या असलेल्या ट्रेनवर दगडफेक सुरू केली. रेल्वेवरील हल्ल्याची माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच आंदोलक गायब झाले होते. नादियामध्ये या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे. मुर्शिदाबाद आणि हावडा येथे शांतता दुसरीकडे, हिंसाचार झालेल्या हावडा जिल्ह्यात आज सकाळी परिस्थिती शांत होती. या भागात फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हावडा आणि मुर्शिदाबाद मधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा, रेझीनगर आणि शक्तीपूर पोलीस स्टेशन परिसरातही परिस्थिती शांततापूर्ण आहे. मात्र, हिंसक आंदोलनानंतर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हिंसक घटनांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून दोन्ही जिल्ह्यांत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री उलुबेरिया, पांचाला, जगतबल्लवपूर आणि धुलागढसह हावडा जिल्ह्यातील अनेक भागात रूट फ्लॅग मार्च काढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात सुरक्षा दलांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे. 100 जणांना अटक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततापूर्ण आहे . हावडा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात कोणतीही नवी घटना घडली नाही. आतापर्यंत एकूण 100 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पूर्णपणे सतर्क झाले आहेत. समाजकंटकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aIMOYR
No comments:
Post a Comment