मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेविरोधात तिसरा उमेदवार उतरवलाय. पण फडणवीसांनी फक्त फॉर्म दिला आणि तो भरायला लावला असं केलेलं नाहीय. त्यांनी आधी निवडून येण्याचं नियोजन आखलं, कुणाची मतं मिळू शकतात याचा अंदाज बांधला आणि तयारीनंतरच धनंजय महाडिकांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात एकूण २९ अपक्ष आमदार आहेत. या आमदारांनी जर भाजपला मदत केली, तर शिवसेनेच्या संजय पवारांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. पण याउलटही होऊ शकतं आणि फडणवीसांना आत्मविश्वास नडूही शकतो. पण हे २९ आमदार कोण आहेत, ते खरंच भाजपला मदत करू शकतात का आणि कुणाचा डाव कुणावर उलटणार, याची सध्या चर्चा सुरु आहे. विषय आहे राज्यसभेच्या निवडणुकीचा.. घोडेबाजाराची शक्यता तर सगळेच जण वर्तवत आहेत. पण राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदान नसतं. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावं लागतं आणि नंतरच ते मतपेटीत टाकावं लागतं. पक्षाने ज्याला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. इथपर्यंत सगळं पारदर्शक वाटत असलं तरी खरा धोका पुढे आहे. हा धोका आहे २९ आमदारांचा. या आमदारांनी ठरवलं तर ते फडणवीस आणि ठाकरे या दोघांपैकी एकाला धक्का निश्चितच देऊ शकतात.. गेमचेंजर ठरणारे २९ आमदार तर आहेत.. पण त्यात बहुजन विकास आघाडी - ३ समाजवादी पार्टी - २ एमआयएम - २ प्रहार जनशक्ती - २ मनसे - १ माकप - १ शेकाप - १ स्वाभिमानी - १ राष्ट्रीय समाज पक्ष - १ जनसुराज्य शक्ती पक्ष - १ क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १ हे असं छोट्या पक्षाशी संबंधित संख्याबळ मिळून एकूण १६ आमदार होतात. यापैकी बच्चू कडू, अबू आझमी, शंकरराव गडाख, देवेंद्र भुयार असे काही आमदार भाजपला मदत करणार नाहीत असं बोललं जातं. कारण, त्यांनी एकतर शिवसेनेच्या पाठिंब्याने मंत्रिपद मिळवलंय, किंवा महाविकास आघाडीशी जवळीक आहे. पुढे खेळ बिघडवू शकतात ते १३ आमदार यात रवी राणा, राजेंद्र यड्रावकर, संजयमामा शिंदे, प्रकाश आवाडे, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, विनोद अग्रवाल, किशोर जोरगेवार, गीता जैन, महेश बालदी, राजेंद्र राऊत अशी काही नावं आहेत. यातही महाविकास आघाडीशी जवळीक असलेले आमदार आहेत. पण इथेच घोडेबाजाराचीही शक्यता जास्त आहे. घोडेबाजार झाला आणि आमदार फुटले, तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असेल. या सगळ्यात विकेट जाईल ती कट्टर शिवसैनिक असलेल्या कोल्हापूरच्या संजय पवारांची. त्यामुळे फडणवीस महाडिकांसाठी जीवाचं रान करणार का, दिल्ली गाठणार? हे पाहणं उत्कंठावर्धक असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SoL7fkc
No comments:
Post a Comment