Breaking

Friday, June 24, 2022

जड आवाज, खोकल्याची ढास, पण ठाकरी बाणा कायम, करोनाग्रस्त मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना 'सलाईन' https://ift.tt/tERUz47

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून मी काय सुख भोगलंय, आनंद कधी उपभोगला हे सांगा. सुरुवातीपासून कोव्हिड आला आणि आव्हानं आली. मला सहानुभूती नाही कमवायची, पण ते निमित्त करुन तुम्ही फुटत असाल तर सांगा, की जी मंत्रिपदं, जो मोकळेपणा शिवसेनेत मिळाला, मी कुठल्याही खात्यात कधीच लुडबूड केली नाही, हे स्वातंत्र्य भाजपसोबत मिळत असेल तर खुशाल जा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला बाहेरचे रस्ते खुले असल्याचं स्पष्ट केलं. सर्दी झालेला आवाज, मध्येच लागलेली खोकल्याची ढास, असं असतानाही करोनाची लागण झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना बळ दिलं. शिवसेनेच्या नगरसेवकांशी ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानावरुन ऑनलाईन संवाद साधला. उद्धव ठाकरे काय म्हणाले? आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत, त्यांनीच हे करायला सांगितलंय, असं सांगून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकदा म्हणायचं राष्ट्रवादीवाले निधी देत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, काँग्रेस मदत करत नाहीत. म्हणून मी यांना बोलावलं, तर ते म्हणाले राष्ट्रवादीवाले त्रास देतात. आमदारांचा दबाव आहे, आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, मी त्यांना सांगितलं कोण आमदार आहेत त्यांना समोर बोलवा. विश्वासघातकी भाजपसोबत जायचं असेल, तर भाजपकडून प्रस्ताव आला पाहिजे, आणि तो शिवसैनिकांना मान्य पाहिजे. भाजपसोबत गेले तर स्वच्छ, आणि आपल्यात राहिलं तर आत टाकणार, याला काय अर्थ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. माझ्या कुटुंबाची बदनामी नको माझी बदनामी करा, पण माझं कुटुंब आणि मातोश्री हे मंदिर आहे, त्याला काळिमा फासू नका, असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी भरला. आमदार माझ्यासमोर त्यांची नाराजी बोलले असते तर इथे मार्ग निघाला असता. तसं न करता ते सुरत आणि गुवाहाटीला का गेले. इतके वर्ष एकनिष्ठ होतात, तर हक्काने का नाही सांगितलं. आमदारांच्या बैठकीत मी अनेक कामं मार्गी काढली. त्यांना विचारलं आणखी काही आहे का, तर ते म्हणाले की सगळं ठीक आहे, पण तुम्ही मधे-मधे भेटत जा. मी बोललो की संवाद तुटलाय, हे मला मान्य आहे. पण माझ्या परीने प्रयत्न करतोय, अशी ग्वाही दिल्याचं ठाकरेंनी सांगितलं. जर मी पक्ष चालवायला नालायक वाटत असेन, आणि केवळ शिवसेनाप्रमुखांनी आवाहन केलं म्हणून तुम्ही मला प्रमुखपदी चालवून घेत असाल, तर ते आवाहन बाजूला ठेवा, कारण मी जर काही वेडंवाकडं केलं असतं, तर बाळासाहेबांनी मी त्यांचा पुत्र असतो, तरी मला माफ केलं नसतं. पण तुम्हाला वाटत असेन, तर मी प्रमुख म्हणून राजीनामा देईन. माझ्या जागी दुसऱ्या कोणाला पक्षप्रमुख पद देऊ. शिवसेना ही खासगी मालमत्ता नाही, एक विचार आहे. मुख्यमंत्रिपदाचा मोह मला आताही नाही, असं उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितलं. कुठल्याही खात्यात लुडबूड नाही हिंदू मतामध्ये फूट नको, म्हणून युती केली, त्याची फळं आपण चाखतोय. त्यांनी आज एक गट स्थापन केला, आणि उद्या जर तो फुटला, तर बाकीचे अवैध ठरतील. त्यामुळे याचा फायदा भाजप घेतंय. एकीकडे शिवसेना खतम करायची, दुसरीकडे भाजप वाढवायची हा त्यांचा डाव कळलाय. शिवसेनेने चढापेक्षा उतारच जास्त पाहिलेत. मुख्यमंत्री म्हणून मी सुख काय भोगलंय, आनंद कधी उपभोगला हे सांगा. सुरुवातीपासून कोव्हिड आला आणि आव्हानं आली. मला सहानुभूती नाही कमवायची, पण ते निमित्त करुन तुम्ही फुटत असाल तर सांगा, की जी मंत्रिपदं, जो मोकळेपणा शिवसेनेत मिळाला, मी कुठल्याही खात्यात कधीच लुडबूड केली नाही, हे स्वातंत्र्य भाजपसोबत मिळत असेल तर खुशाल जा, असं म्हणत ठाकरेंनी दरवाजे खुले असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्रीच होणार असाल, तर सांगायचं होतं, मी केलं असतं. मी माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत वार करणारी औलाद नाही. या बंडाला माझी फूस नाही. महाविकास आघाडीत जाण्याप्रमाणे हाही निर्णय मी उघड घेतला असता. तुम्ही निवडून आलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडाल का, शिवसैनिक तुमच्या मागे येत असेल तर घेऊन जा, एका पत्रकाराने सांगितलं की शिवसेना युतीत आळसावते, ती तलवारीसारखी आहे, म्यानात ठेवली की गंजते, बाहेर काढली की तळपते. आता तळपण्याची वेळ आहे. हा शिवसेना संपवण्याचा डाव आहे, हिंदू मतं फोडण्याचं पाप करताय, असं म्हणत ठाकरेंनी भाजपलाही खडसावलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ftq8GCu

No comments:

Post a Comment