दहावी आणि बारावी या सार्वत्रिक परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांमधील उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण, विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांची वाढलेली संख्या यांवर अधिक बोलले जाते आणि परीक्षा खूप सोप्या झाल्या असून, गुणांची खैरात केली जात असल्याचा शेरा मारला जातो. शुक्रवारी जाहीर झालेला दहावीचा निकाल या निरीक्षणाला आणि शेऱ्याला अपवाद नाही. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेला बारावीचा निकालही याच पंक्तीतील होता. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही परीक्षांतील उत्तीर्णांचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक राहू लागले आहे. परीक्षांत विचारले जाणारे विशिष्ट प्रश्न, त्यांना अभिप्रेत असलेली उत्तरे, उत्तरांतील प्रत्येक मुद्द्यांना स्वतंत्र गुण देण्याची पद्धत, काठिण्याचा स्तर कमी करणे, अंतर्गत मूल्यांकन, अभ्यासासाठीची साधने सर्वांना सहजगत्या उपलब्ध होणे, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याच्या सरावावर अधिक भर देणे, सार्वत्रिक परीक्षांबद्दल तीन दशकांपूर्वीपर्यंत असलेली भीती कमी होणे ही उत्तीर्णांचा टक्का वाढण्यामागील खरी कारणे. सार्वत्रिक परीक्षांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि अभ्यासक्रमातील कोणत्या भागांना किती गुण हे ठरलेले असते. या साऱ्यांची माहिती करून घेतली आणि त्यानुसार अभ्यास केला, की उत्तम गुण मिळविण्याचे तंत्र अवगत होते. हे तंत्र पूर्वी तुलनेने कमी विद्यार्थ्यांकडे असे, आता ते सर्वांना अवगत होऊ लागले आहे. थोडक्यात, या तंत्राचे सार्वत्रीकरण होत आहे; शिवाय अंतर्गत मूल्यमापन, सर्वोत्तम पाच, प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षांत किमान एक दिवसाची सुट्टी आदी योजनाही राबविल्या जात आहेत. असे असताना दहावी-बारावीत उत्तीर्णांची टक्केवारी नव्वदीपार गेली नसती, तरच नवल. कोव्हिडमुळे गेल्या वर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आणि अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. या वर्षी साथरोग सौम्य असल्याने परीक्षा घेतली गेली; परंतु ती ७५ टक्के अभ्यासक्रमावरच आधारलेली होती; शिवाय प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी गुणांनुसार १५ ते ३० मिनिटे वेळ अधिक देण्यात आला होता. याचाही सकारात्मक परिणाम निकालावर झालेला दिसतो. यंदा राज्यात १५.६८ लाख विद्यार्थ्यांपैकी ९६.९४ टक्के, म्हणजे १५.२१ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यांपैकी ४२.७९ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर ३७.४८ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. थोडक्यात, ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. हे यंदाच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. परीक्षेत गुण मिळविण्याच्या तंत्राच्या सार्वत्रीकरणाचा हा पुरावाच म्हणावा लागेल; त्यामुळे पूर्वी गुणवत्ता अधिक होती आणि आता ती खालावली, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. वास्तविक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढच होत आहे; कारण परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यंदा दहावीला १५.६८ लाखांपैकी १२.२० लाख विद्यार्थ्यांना साठ टक्क्यांहून अधिक गुण आहेत. त्यांना मिळालेले हे गुण, त्यांनी संपादित केलेल्या ज्ञानापेक्षा, त्यांनी अवगत केलेल्या तंत्राचे आहे. अकरावीला प्रवेश मिळविताना हे गुण उपयुक्त आहेत हे नक्की; परंतु त्यानंतरच्या शिक्षणात तंत्राबरोबरच ज्ञान आणि आकलनाला अधिक महत्त्व राहते. याची जाणीव विद्यार्थ्यांना आणि मुख्य म्हणजे पालकांना व्हायला हवी. दहावी-बारावीच्या निकालानंतर गुणवत्तेची चर्चा करायला हरकत नाही; परंतु आपली एकूण शिक्षण पद्धत परीक्षाकेंद्रीत आहे. परीक्षांतील गुणांवरच मूल्यांकन केले जात असेल, तर विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी होण्यात गैर नाही. त्यामुळे, सार्वत्रिक परीक्षांवरून गुणवत्तेबाबत निष्कर्ष काढण्याला अर्थ नाही; परंतु आयुष्यात ज्ञानसंपादनाला अधिक महत्त्व असते, हे त्यांना पटवून देणे आवश्यक आहे. वास्तविक, या परीक्षांकडे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. यंदा या दोन परीक्षांत मिळून सुमारे तीस लाख विद्यार्थी बसले. उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा टक्का वाढविण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा ठरतो. देशात सध्या अठरा ते चोवीस या वयोगटातील २७ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. प्रगत आणि काही विकसनशील देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानेही भर दिला आहे. त्यासाठी महाविद्यालयांची आणि विद्यापीठांची संख्या वाढवावी लागेल. शिक्षकांची संख्या आणि अन्य सुविधाही वाढवाव्या लागतील. यासाठी पैसा लागतो आणि सरकार तो द्यायला तयार नाही. उलट सरकारचा शिक्षणावरील खर्च कमी होत आहे. म्हणूनच, करिअरच्या उत्तम संधी देणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. तिथे प्रवेशासाठी गुणवत्तेपेक्षा पैसा महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या कटू वास्तवाला सामोरे जावे लागेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lQDhPL3
No comments:
Post a Comment